कोरोना दुसऱ्या लाटेत होती सर्वाधिक व्हेंटिलेटर्सची मागणी; आता भंगारातही विचारेना !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 03:05 PM2022-07-12T15:05:11+5:302022-07-12T15:23:52+5:30
कोरोनाकाळात व्हेंटिलेटर्सची सर्वाधिक मागणी...
पिंपरी : शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढली; परंतु त्यानंतर २०२१ मध्ये मार्च ते मे या कालावधीत शहरात दुसरी लाट आली होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या जास्त होती. या काळात गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर्सची गरज भासत होती. रुग्णसंख्या जास्त आणि व्हेंटिलेटर्सची संख्या कमी अशी स्थिती त्यावेळी झाली होती. त्यातच महापालिका रुग्णालयात व्हेंटिलेटर्सची संख्या खूपच कमी होती. परिणामी केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि सीएसआर निधीतून महापालिकेला व्हेंटिलेटर्स दिले होते.
आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे व्हेंटिलेटर्स महापालिकेच्या रुग्णालयात लावले आहेत. तसेच शहरात जम्बो कोविड सेंटर सुरू केले होते. जम्बो कोविड सेंटर बंद झाल्यानंतर त्यातील व्हेंटिलेटर्स आणि इतर साहित्य हे महापालिका रुग्णालयात लावण्यात आल्याची माहिती, महापालिका वैद्यकीय विभागाने दिली. महापालिकेने चार नवीन रुग्णालये सुरू केली आहेत, त्याठिकाणी देखील कोरोना काळातील काही साहित्य लावले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या कमी होती. त्यावेळी या काळात व्हेंटिलेटर्सची जास्त गरज भासली नाही.
लाखो रुपयांचा चुराडा ?
कोरोना काळात आलेले व्हेंटिलेटर्स महापालिका रुग्णालयात लावण्यात आले आहे; परंतु यातील काही व्हेंटिलेटर्स आणि इतर साहित्य स्टोअर रुममध्ये पडूनच असल्याची माहिती आहे. याबाबत वैद्यकीय विभागाशी संपर्क केला असता किती व्हेंटिलेटर्स पडून आहेत, याची माहिती घेण्यात येईल असे सांगण्यात आले. योग्य वेळेत हे व्हेंटिलेटर्स वापरात न आल्यास लाखो रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना काळात शासनाकडून आलेले व्हेंटिलेटर्स महापालिका रुग्णालयात लावण्यात आले आहेत. तसेच जम्बो कोविड सेंटरमधील काही साहित्य आणि व्हेंटिलेटर्स पालिका रुग्णालयात लावण्यात आले आहेत.
डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक, आरोग्य, वैद्यकीय अधिकारी, महापालिका