मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:13 AM2018-08-15T01:13:30+5:302018-08-15T01:14:17+5:30
पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरू आहे. दापोडीपर्यंतच या कामाला गती आहे. पुढील मार्गाचे काय, असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत विचारण्यात आला.
पिंपरी - पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरू आहे. दापोडीपर्यंतच या कामाला गती आहे. पुढील मार्गाचे काय, असा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत विचारण्यात आला. पुण्यातील काम वेगाने होत नसेल, तर पिंपरीची मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशीही मागणी केली.
स्थायी समितीच्या सभेत मेट्रोवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. मेट्रोने रस्ते खोदल्याने नागरिकांना त्रास होत आहे. कामे सुरू नसतानाही रस्ता अडवून ठेवला जातो, याबाबत सदस्यांनी आक्षेप घेतला.
बीआरटी प्रकल्पही केवळ दापोडी ते निगडी असाच सुरू झाला आहे. मेट्रोचे कामही शहरातच सुरू आहे. पुण्यातून कधी सुरू होणार? पुणे परिसरात मेट्रोच्या कामास गती नाही, याबाबत सदस्यांनी प्रशासनास विविध प्रश्न विचारले. रस्ता खोदाईविषयी नाराजी व्यक्त केली. परवनगी न घेताच कोणी रस्ते खोदाई करीत असेल तर प्रशासन कारवाई करते. मात्र, मेट्रोच्या खोदाईबाबत दुर्लक्ष का, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती प्रशासनावर करण्यात आली.