पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण घटल्याने रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणीत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:06 PM2020-12-18T14:06:47+5:302020-12-18T14:08:53+5:30
कोरोनाच्या गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्शन दिले जाते.
पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी कमी झाली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन लाभदायी ठरले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सध्या २००० रेमडेसिव्हर इंजेक्शचा साठा उपलब्ध आहे. कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाला रेमडेसिव्हर इंजेक्शन दिले जात नाही. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. एका गंभीर रुग्णांना या इंजेक्शनचे सहा डोस दिले जातात. जुलै ते सप्टेंबर या महिन्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळणे कठीण झाले होते. रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. या काळात इंजेक्शनच्या काळाबाजार होत होता. अवाच्या सवा दराने इंजेक्शनची विकले जात होते. त्यानंतर राज्य शासनाने २३६० दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता.
जास्त दर आकारणाऱ्या मेडिकल दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने सांगितले होते. रुग्णसंख्या कमी होत आहे. परंतु रुग्णसंख्या वाढल्यास तुटवडा भासू नये, म्हणून महापालिकेने रेमडेसिव्हर इंजेक्शनची खरेदी केली आहे.
---
अँटिजेन टेस्ट, औषधीसाठा मुबलक
सध्या शहरात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात २००० रेमडेसिव्हर इंजेक्शनचा साठा आहे. १५००० अँटिजेन टेस्ट किट उपलब्ध आहे. ३०००० अँटिजेन टेस्ट किटची मागणी अजून प्रलंबित आहे. पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे.
----
२०० इंजेक्शनची दररोज गरज
२००० सध्या रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध साठा
---
सध्या रेमडेसिव्हर इंजेक्शन, औषधे, अँटिजेन टेस्ट किटचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने काही प्रमाणात मागणी कमी झाले आहे.
-डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, महापालिका
---
कोरोनाचे एकूण रुग्ण - ९४७७७, उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ९१४९३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १५६०