तहसीलदारांकडील निकाल मित्राच्या बाजूने लावण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी; निगडीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:51 PM2021-07-01T20:51:24+5:302021-07-01T20:53:04+5:30
याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
पिंपरी : तहसीलदार यांच्याकडील सुनावणीचा निकाल मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खासगी व्यक्तीच्या विरोधात गुरुवारी (दि. ७) निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दिलीप दंडवते (रा. दिघी), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आरोपी दंडवते याचा खडी क्रेशरचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या मित्राच्या जमिनीच्या सातबारामधील क्षेत्रामध्ये नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबत पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारांकडे सुनावणी होती. त्याचा निकाल तक्रारदार यांच्या मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी आरोपीने तहसीलदार पिंपरी -चिंचवड यांच्यासाठी ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदाराने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जानेवारी २०२० मध्ये याप्रकरणी पडताळणी करून तपास करण्यात आला. त्यात लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७अ प्रमाणे निगडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १) गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी याप्रकरणी पडताळणी केली, तर पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी तपास केला.