नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 07:56 PM2019-03-18T19:56:47+5:302019-03-18T20:13:21+5:30
लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकाऱ्याने धक्काबुक्की करून त्यांच्या कानशिलात लगावली.
लोणावळा : मद्यधुंद अवस्थेमध्ये लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करा, अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व शिष्टमंडळाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी गेनू मानकू बोडके (वय 54) हे जुना खंडाळा येथील अशोक निर्वाण समोर रविवारी दुपारी पाणीपुरवठ्याची लाईन लिकेज काढण्याचे काम करत असताना त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत आलेले पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी हे काय चालले आहे असे विचारत बोडके यांना धक्काबुक्की करून कानशिलात लगावली. यावेळी बोडके यांनी साहेब माझी काय चुकी आहे असे विचारले असता पुन्हा त्यांच्या अंगावर धाऊन जात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत त्यांना पुन्हा मारहाण केली. तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या वेळी धावून आलेले अशोक निर्वाणचे वॉचमन देशपांडे यांना देखील मारहाण करण्यात आली. शिवथरे यांच्या या कृतीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटनेदरम्यान त्या ठिकाणी आलेले माजी नगरसेवक विजय सिनकर व अशोक गोविंद यांनी सदर प्रकरणी सोडवा सोडव केली. सदरच्या घटनेमुळे कर्मचायांमध्ये प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवथरे यांच्या या कृतीचा नगर परिषदेतील नगरसेवक, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक व नगराध्यक्ष यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेचा निषेध नोंदविला. शिवथरे यांचे तातडीने निलंबन न झाल्यास लोणावळा शहर बंद करून पोलीस प्रशासनाच्या विरोधात लोणावळेकर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, विजय सिनकर यांनी शहरवासीयांच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना दिला आहे.
................................
चौकशी करुन कारवाई करणार - संदीप पाटील
ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या बाबत यापूर्वी देखील तक्रारी आल्या असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे. काल लोणावळ्यात घडलेल्या प्रकरणाची योग्य चौकशी करुन चौकशी अहवाल कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पाठवून चार दिवसात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी नगराध्यक्षा व शिष्टमंडळाला दिले आहे.