भुताटकीमुळे प्रेक्षागृहाचे काम थंडावले, मांत्रिकाच्या विधीनंतर कामगार पुन्हा कामावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 08:48 PM2018-03-15T20:48:25+5:302018-03-15T20:48:25+5:30

अंधश्रद्धेचा कळस गाठल्याच्या या घटनेने समाजात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. 

Demonstrating the work of the auditorium due to ghostly, after the mantra ritual, the workers re-employed | भुताटकीमुळे प्रेक्षागृहाचे काम थंडावले, मांत्रिकाच्या विधीनंतर कामगार पुन्हा कामावर

भुताटकीमुळे प्रेक्षागृहाचे काम थंडावले, मांत्रिकाच्या विधीनंतर कामगार पुन्हा कामावर

googlenewsNext

पिंपरी : थेट दवाखान्यात तेही डॉक्टरांच्या समक्ष रुग्ण महिलेला आजारातून बरे करण्यासाठी अंगारे धुपारे लावून मंत्र तंत्र विधी केले. मात्र असे अघोरी प्रकार सुरू असताना, महिला दगावली. पुरोगामी विचारांचा वारसा जपणा-या पुण्यात अंधश्रद्धा पसरविणारी घटना ताजी असताना, या घटनेपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या प्रेक्षागृहाचे नूतनीकरणाचे सुरू असलेले काम भुताटकीच्या भीतीने कामगारांनी बंद ठेवले. मृतात्म्याची शांती घालण्याच्या भावनेतून विधीवत पूजा केली. त्यानंतरच काम पुन्हा सुरू केले. अंधश्रद्धेचा कळस गाठल्याच्या या घटनेने समाजात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. 
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे नूतनीकरण सुरू आहे. स्थापत्य विषयक कामे संपली असून आता अंतर्गत सजावट आणि वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू आहे. वातानुकूलित यंत्रणेचे काम आनंद रेफ्रिजेटर या संस्थेला दिले आहे. प्रेक्षागृहाच्या आतील बाजूस काम करीत असताना अचानक महिलेचा आवाज आला, बांगड्या खळखळल्याचा आवाज येऊ लागला. असा आरडा ओरडा कंत्राटदार संस्थेकडे काम करणा-या कामगारांपैकी एकाने केला. भुताटकीचा प्रकार आहे, असे भासविल्याने कामगार भयभीत झाले. या ठिकाणी कामावर येण्यास कामगारांना भीती वाटू लागली.आठ दिवसांपासून कामगारांची अनुपस्थिती जाणवू लागली. त्यातील एकाने भूत, पिश्याच्च असल्याने विधीवत पूजा करून शांती घातली पाहिजे, तरच या ठिकाणी काम करता येईल, अशी उपाययोजना सूचविली. कामगारांनी एकत्रित येऊन मांत्रिकाला पाचारण केले. प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी हळद, कुंकू, लिंबू, मिरची व अन्य पूजा साहित्य आणले. मांत्रिकाकरवी विधीवत कार्यक़्रम घेतल्यानंतर कामगारांच्या मनातील भीती दूर झाली. तब्बल आठ दिवस रखडलेले काम मांत्रिकाकरवी पूजा घातल्यानंतर पूर्ववत सुरू झाले आहे. अंधश्रद्धेपोटी विकासकामांना अडथळे येणे शहरासाठी अशोभनीय आहे. वैज्ञानिक क्रांतीच्या युगात पुण्यासारख्या शहरात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. 

कर्मचा-यांवर कारवाई 
महापालिकेच्या आचार्य अत्रे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आनंद रेफ्रिजिरेशन या संस्थेला वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम दिले आहे. त्यांच्याकडील कामगाराने अंधश्रद्धेपोटी भुताटकी घालविण्यासाठी मांत्रिकाला बोलावून पूजा घातली असल्याची चर्चा आहे.  ठेकेदाराने त्या कामगारास तातडीने कामावरून काढून टाकले आहे. महापालिकेच्या कामावर कसलाही परिणाम झालेला नाही. वातानुकूलित यंत्रणेचे काम आणखी दीड महिना सुरू राहील.  

- प्रवीण तुपे
सह शहर अभियंता 

Web Title: Demonstrating the work of the auditorium due to ghostly, after the mantra ritual, the workers re-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.