आंदोलकांची मागणी : नराधमांना कठोर शिक्षा द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:42 AM2018-10-01T02:42:58+5:302018-10-01T02:43:27+5:30
पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून अत्याचाराच्या घटनांचा निषेध
रावेत : हिंजवडीलगतच्या कासारवाई आणि पिंपरी-चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या. त्यामधील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी व महिला सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी छावा मराठा युवा संघाच्या महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा स्मारकापासून पोलीस आयुक्तालयापर्यंत आघाडीतर्फे शनिवारी मोर्चा काढण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांना आघाडीतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अत्याचाराच्या घटनांतील नराधमांना त्वरित शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
छावा मराठा युवा संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हेमलता लांडे पाटील, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्षा मनीषा जाधव, पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख स्वाती भोई, सारिका फुगे, राजश्री शिरवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर, जिल्हा उपाध्यक्ष नाना फुगे, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष सूरज ठाकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष गौरव धनवे, कार्याध्यक्ष विवेकानंद माने आदी या वेळी उपस्थित होते. सध्या शहरामध्ये भययुक्त व असुरक्षिततेचे वातावरण झालेले आहे. हिंजवडीलगतच्या कासारसाई व पिंपरी येथे माणुसकीला काळिमा फासणाºया घटना घडल्या. पिंपरी येथील रमार्ईनगर परिसरामधील घटनेत सातवर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. लैंगिक अत्याचार झाला असल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना व्हावी. त्यासाठी आपण महिला अत्याचार संदर्भातील छोट्यात छोट्या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अत्याचार करणाºया नराधमांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व महिला सुरक्षिततेसाठी आपण योग्य त्या उपाययोजना प्रस्थापित कराव्यात यातून अशा दुर्दैवी घटनांना नक्कीच आळा बसू शकेल, असे निवेदनात नमूद केले आहे.
असुरक्षितता : गुन्हेगारीला आळा घाला
शहर आणि परिसरात अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांमधून महिलांसह बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. त्यातूनच ते दोषी पुढे बलात्कारासारखे मोठे गुन्हे करण्यासाठी पुढे सरसावतात. यामुळे अशा मनोवृत्तीच्या व्यक्तीवर योग्य कारवाई होणे गरजेचे आहे. एकीकडे आपण महिलांना पुरुषांबरोबरचा दर्जा असल्याचा दावा करतो व दुसरीकडे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसविण्याची मागणी करण्यात आली.