वीस दिवसांत ५३ जणांना डेंगी, आरोग्य विभागाची वाढली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:16 AM2018-12-20T01:16:54+5:302018-12-20T01:17:13+5:30
डेंगीच्या रुग्णांत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरामधील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पिंपरी : शहरामध्ये ताप, सर्दी, खोकला अशा आजारांनी शहरवासीय त्रस्त आहेत. त्यामध्ये डेंगीच्या रुग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर महिन्यांच्या २० दिवसांमध्ये ३३३ संशयित रुग्णांपैकी ५३ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दर महिन्याला डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
डेंगीच्या रुग्णांत यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरामधील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ४५७० तापाचे रुग्ण आढळले. यामध्ये ८५९ संशयित रुग्णांपैकी २१८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर जानेवारी महिन्यांपासून आतापर्यंत ५६३ रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. शहरातील वाढत्या अस्वच्छतेने कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरू असून डेंगी प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.