पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले; एका महिन्यात हजारापेक्षा जास्त संशयित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 06:32 PM2023-08-30T18:32:33+5:302023-08-30T18:33:27+5:30
बदललेले वातावरण, त्यात डासांचा त्रास जाणवू लागल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे...
पिंपरी : शहरात थंडी-तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया रुग्णांची भर पडत असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ४९ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांतील बाधितांची संख्या ८५ वर गेली आहे. या एका महिन्यात १९५१ संशयित आढळले आहेत.
बदललेले वातावरण, त्यात डासांचा त्रास जाणवू लागल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. शहरात डेंग्यू आजाराच्या तापाने नागरिक फणफणले आहेत. शहरात जुलै महिन्यामध्ये ३६ जणांना डेंग्यूची लागण झाली होती; तर ऑगस्ट महिन्यामध्ये ४९ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये १९५१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. १३ हजार ७१२ रुग्णांना तीव्र थंडीताप असून सहाजणांना मलेरियाची लागण झाली आहे. पावसाळा सुरू झाला की, अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार होतात. गटार, नाले यांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता केली न गेल्यास पाणी साचले जाते. घराचा परिसर स्वच्छ न केल्यास परिसरात पाणी साचून यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होत असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होते. शहरातील नागरिकांना त्याचा फटका बसत असून डेंग्यू व मलेरियाची साथ बळावत आहे.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यूचे मच्छर चावल्याने व्यक्ती आजारी पडण्यास सुरुवात होते. व्यक्तीला १०१ अंश सेल्सिअस ताप येतो. खोकला, घसा खवखवणे, अशक्तपणा, शरीरातील पाणी कमी होणे, बीपी कमी होणे, सफेद पेशी कमी होणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. तसेच मलेरिया झाल्यावरदेखील ही लक्षणे आढळतात.
आकडेवारीवर एक नजर
महिना - तापाचे रुग्ण - मलेरिया - डेंग्यू संशयित - डेंग्यू पॉझिटिव्ह
जून - १०,१००- ०५- ४७२- ००
जुलै - १३,८५५- ००- १४३२- ३६
ऑगस्ट - १३७१२- ०६- १९५१- ४९
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत असले तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात डासांची पैदास होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच थंडी, ताप, खोकला अशी डेंग्यूची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.