डेंग्यू नियंत्रण रॉकेलने धुरकटले
By Admin | Published: November 5, 2014 05:27 AM2014-11-05T05:27:36+5:302014-11-05T05:31:20+5:30
गेल्या चार महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे या डेंग्यूच्या साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेकडून शहरात महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने बंदी
पुणे : गेल्या चार महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे या डेंग्यूच्या साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेकडून शहरात महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने बंदी घातलेली असतानाही, धुराळणी पुन्हा एकदा सुरू केली आहे. मात्र, ही फवारणी करताना, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये डिझेल मिसळणे गरजेचे असताना चक्क रॉकेल मिसळले जात आहे. तर, अनेक ठिकाणी केवळ रॉकेलच्याच
धुराची फवारणी केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांतून धुराळणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वास्तविक या धुराळणीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातलेली आहे. तरीही डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ही धुराळणी चालू आहे. या धुराळणीच्या वेळी रॉकेलचा वास येत असल्याची तक्रार काही नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली होती. त्यानुसार ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शहरात पाहणी केली. काही ठिकाणी धुराळणीसाठी फक्त रॉकेलचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही कबुली एका औषध फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच चक्क याची कबुली शहरातील एका डॉक्टरांकडे दिली आहे.
डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३ हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे महापालिकेकडून शहरात मिशन फाईव्ह डे हा उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच, शहरात सर्वत्र धूर फवारणी आणि औषध फवारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने ३०० हून अधिक मशिनही भाडेकराराने खरेदी केलेल्या आहेत. मात्र, धुराळणीसाठी मिसळल्या जाणाऱ्या औषधाचे प्रमाणही इतके नगण्य आहे, की फवारणीनंतर केवळ रॉकेलचाच घमघमाट पसरत असल्याचे
चित्र आहे.(प्रतिनिधी)