डेंगीची साथ: आणखी किती जणांचा जाणार बळी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:58 AM2017-08-04T02:58:50+5:302017-08-04T02:58:52+5:30
पावसामुळे खडकीतील डबक्यात व खोलगट भागात साठवणूक केलेल्या पाण्याचे ड्रम, कुंड्या, बाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाक्या तपासण्यात येत असून
खडकी : पावसामुळे खडकीतील डबक्यात व खोलगट भागात साठवणूक केलेल्या पाण्याचे ड्रम, कुंड्या, बाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या उघड्या टाक्या तपासण्यात येत असून, खडकीत डेंगीचे चार रुग्ण सापडले असून, अन्य ५७ जणांचे रक्ताचे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय डॉक्टर रणजित भोसले यांनी लोकमतला दिली आहे.
रुग्णालयात डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू आदी साथीच्या आजारांवर जनजागृती व निवारण करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य विभागामार्फत एक कक्ष स्थापन करण्यात आला असून, या कक्षात दोन आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खडकीतील प्रत्येक वस्ती, मोहल्ल्यामध्ये पाण्याचे ड्रम भरून घराबाहेर ठेवलेले असतात. त्या स्वच्छ पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. याकरिता असे पाण्याचे भरलेले ड्रम रिकामे करण्यात येत असून, नागरिकांना डेंगीबद्दल माहिती देऊन औषध फवारणी, पाणी जास्त दिवस साठवून न ठेवण्याची माहिती दिली जात आहे.
जाधववाडीत मलेरिया, डेंगी, चिकुनगुनियाचे थैमान-
जाधववाडी : पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढल्याने जाधववाडीत सध्या अनेक प्रकारच्या तापाने थैमान घातले आहे. या परिसरातील अनेक घरांच्या छतांवर पाणी साचत आहे. कुदळवाडीत अनेक ठिकाणी डेंगीसदृश रुग्ण आढळले आहेत. जागोजागी भंगार व्यावसायिकांच्या छतावर साचलेले पाणी जुनी फ्रीज ची दुकाने सार्वजनिक प्रार्थना स्थळे, या ठिकाणीही स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. जाधववाडीतच २० ते २५ जणांना डेंगीची लागण झाली आहे़ कुदळवाडीतदेखील ३० ते ३५ जणांना लागण झाली आहे़ व काहींना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
काही बैठ्या घरांवर पावसाचे पाणी गळू नये म्हणून ताडपत्री अथवा प्लॅस्टिक कागद टाकला जातो. त्यात देखील पावसाचे पाणी साठून राहते. अशा
अनेक ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगी पसरण्याची अधिक शक्यता असते. सध्या शहरभरात सगळीकडे साथीच्या तापाने डोकेवर काढले असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अंगावर लाल रंगाचे पुरळ येणे, शरीरावर खाज सुटणे, घशाला कोरड पडणे, हिरड्या लालसर होणे, हात-पाय दुखणे, शरीरातील पेशींची संख्या कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्यसेवकांनी केले आहे. तापाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.