श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलैला प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:08 PM2021-05-16T17:08:08+5:302021-05-16T17:09:00+5:30
संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली माहिती
देहूगाव- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे १ जुलैला प्रस्थान होणार आहे. भजनी मंडपातून दुपारी २ वाजता पालखी पंढरपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोव्हीड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या आषाढवारी पायी पालखी सोहळ्याला सुरवात होणार असून या पालखी सोहळ्याच्या तयारीला संस्थानच्या वतीने सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुखांची निवड व पालखी प्रस्थानाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यासाठी संस्थानच्या कार्यालयात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालखी सोहळा प्रमुख म्हणून अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या पालखी सोहळा प्रमुखांच्या नियंत्रणात श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पालखी सोहळ्याचे नियोजन केले जाणार आहे. यावेळी संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.
पालखी सोहळा हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव समजले जाते. यासोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहू ते पंढरपूर पायी वारी करत असतात. गतवर्षी पालखी प्रस्तान सोहळ्याच्या आगोदर काही दिवस व प्रस्थानच्या वेळी श्री क्षेत्र देहूगावसह, पुणे जिल्ह्यात व राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. वारीची परंपरा खंडीत होऊ नये. ही भाविकांची व वारकऱ्यांची मागणी याचा विचार करून या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने हा पालखी सोहळा मोजक्याच लोकांच्या म्हणजे अवघ्या २० भाविकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आदेश दिले होते. पालखी प्रस्थानापासून सर्व कार्यक्रम मंदिराच्या आवारातील भजनी मंडपात पालखी सोहळ्यातील सर्वच सोपस्कार पार पाडले जात होते.
आषाढ महिन्यातील दशमीच्या दिवशी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी ऐवजी केवळ पादुकाच पंढरपूरला बसमध्ये नेण्याची शासनाने परवानगी दिली होती. या काळात ही बस कोठेही न थांबविता थेट पंढरपूर येथे पालखी मुक्कामाच्या दिवशी नेण्यास परवानगी दिली होती. व बारशीच्या दिवशी नगरप्रदक्षिणा घालुन पालखी पालखी परतीच्या मार्गाने देहूत मुक्कामी आली होती. येथेच उर्वरीत पालखी सोहळा देखील भजनी मंडपात पार पडला होता व पालखी सोहळ्याची सांगता देखील मंदिरात केवळ २० लोकांच्या उपस्थितीत झाली होती.