‘आरटीओ’ असूनही खोळंबा, नागरिकांना हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 06:49 AM2017-10-07T06:49:16+5:302017-10-07T06:49:27+5:30
कामकाज सुलभ व्हावे, त्यात सुसूत्रता व गतिमानता यावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. मात्र,
पिंपरी : कामकाज सुलभ व्हावे, त्यात सुसूत्रता व गतिमानता यावी यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संगणक प्रणालीचा अवलंब केला जात आहे. मात्र, या संगणक यंत्रणेत वारंवार व्यत्यय येत असल्याने गतिमान कामकाजाऐवजी ढीम्म कारभाराचा प्रत्यय नागरिकांना येऊ लागला आहे. शहरात आरटीओचे कार्यालय खुले असूनही काम मात्र ठप्प होत असल्याचा प्रकार अनेकदा घडतो. कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट समस्या या सबबींमुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे नित्याचेच झालेत.
वाहन चालविण्याचा परवाना काढायचा असेल, तर आॅनलाइन अपॉइंटमेंट घेणे भाग पडते. आॅनलाइन अपॉइंटमेंटसाठी दलालांची मदत घ्यावी लागते. आॅनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दुचाकीची चाचणी द्यावी लागते. अनेकदा सलग दोन ते तीन दिवस प्रयत्न करूनही आॅनलाइन अपॉइंटमेंट मिळत नाही. अन् मिळालीच तर महिना ते दीड महिना वाट पहावी लागते. त्यामुळे नडलेल्या ग्राहकांना दलालाकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
कार्यालयात अपुरे मनुष्यबळ
पूर्णानगर चिखली येथील कार्यालयासाठी ३८ पदांना शासनाची मंजुरी आहे. मात्र, २२ जागा रिक्त आहेत. कमी मनुष्यबळात अधिक काम करावे लागते. त्यामुळे खासगी व्यक्ती सहायक म्हणून काम करताना दिसून येतात. अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती संगणकावर असल्याने त्या त्या कर्मचाºयांना स्वतंत्र लॉगिन कोड आणि पासवर्ड दिलेले आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने कोडिंग केले असल्याने संबंधित कर्मचाºयाच्या बोटाचे ठसे जुळले तरच लॉगिन होते. पुढील माहिती संगणकावर पाहता येते. अशी यंत्रणा कार्यन्वित केली असल्याने एखाद्याच्या संगणकावरील माहिती दुसºयाला पाहात येत नाही. परिणामी एखादी व्यक्ती रजेवर असेल, तर त्याच्या अनुपस्थितीत त्या विभागातील काम करता येत नाही. संबंधित कर्मचारी रजा संपवून ज्या वेळी कार्यालयात रुजू होईल. त्या वेळी संबंधित काम करणे शक्य होते. अशा स्वरूपाचे अनेक अडथळे कामकाजात वारंवार येत आहेत.