‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार; बैलगाडा मालक-चालक कृती समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:01 PM2017-10-24T16:01:49+5:302017-10-24T16:07:25+5:30
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. या पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
पिंपरी : अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक कृती समिती यांच्या वतीने मंगळवारी भोसरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक-शौकिन यांची बैठक झाली. त्यावेळी यावेळी पेटा या संस्थेच्या हेतूला लक्ष्य केले. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. सत्ताधारी भाजप सरकार शर्यतीबाबत सकारात्मक आहे. पण, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू पेटा आहे. या पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.
भोसरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक झाली. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, विधी समिती सभापती सागर गवळी, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, वसंत बोर्हाटे, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, राजेंद्र लांडगे, बैलगाडा मालक भानुदास लांडगे, काकासाहेब गवळी, अंकूश मळेकर, नरहरी बालघरे, अभिजित तिकोणे, केतन जोरी, महेश शेवकरी, भाउसाहेब गिलबिले, सतोष गव्हाणे, काळुराम सस्ते, विलास भुजबळ, मयूर वाबळे, अण्णा भेगडे, राहुल सातपुते, दत्तात्रय मोरे, किसन यादव, राजू नेवाळे, विनायक मोरे, अनिल लांडगे आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, सुमारे २००८ पासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र, २००८ ते २०१४ पर्यंत कोणत्याही सरकारने बंदी उठविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही. तसेच, कोणत्याही पक्षाच्या नेत्यांने स्वखर्चाने न्यायालयात बाजू मांडण्याची भूमिका घेतली नाही. मात्र, भाजपाच्या सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार केला. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठिंबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखचार्तून वकीलांची नेमणूक केली आहे.मात्र, काहीलोक बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत सरकारचे अपयश असल्याचा अपप्रचार करीत आहेत. मात्र, सरकारच्या सहकार्याशिवाय बैलगाडा शर्यतीचे विधेयक तयार होणे अशक्य होते.
आमदार लांडगे म्हणाले, बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत आजवर जो काही पाठपुरावा केला. त्याबाबत मी कधीही मीच केले, असे म्हटलेले नाही. आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यतीबाबत केलेल्या पाठपुराव्याचे राजकारण केले नाही. एवहढेच नव्हे, तर माज्याशिवाय बैलगाडा शर्यती सुरू होणार नाहीत, असेही कधी म्हटलेले नाही. मी प्रामाणिकपणे बैलगाडा मालकांसाठी काम करीत आहे. राजकीय फायदा होवो अथवा न होवो मी बैलगाडा शर्यतीवरून श्रेयवादाचे राजकारण केले नाही. करणार नाही.