दृढनिश्चय! साठाव्या वर्षी पदवीधर होण्याचे कामगार नेत्याचं स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:26 AM2018-11-15T00:26:35+5:302018-11-15T00:28:23+5:30
फतेजा फोर्जिंग कंपनीतील कामगार नेते कारभारी पुंडे यांनी वयाच्या साठाव्या वर्षी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होण्याचे
भोसरी : फतेजा फोर्जिंग कंपनीतील कामगार नेते कारभारी पुंडे यांनी वयाच्या साठाव्या वर्षी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. कारभारी गुलाबराव पुंडे मूळचे शिरूर तालुक्यातील कान्हुर मेसाई या गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या ते भोसरी येथे वास्तव्यास आहेत. परिस्थितीअभावी त्यांना नववीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. मात्र, त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द कायम बाळगली.
भोसरीतील फतेजा फोर्जिंग कंपनीतील कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. कंपनी बंद पडल्यानंतर कामगारांना त्यांची देणी मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे कामगारांच्या वतीने ते न्यायालयात लढा देत आहेत.
पुंडे यांनी २०१४-१५ मध्ये बारावीची बहिस्थ पद्धतीने परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य अर्थात डिस्टिंक्शनमध्ये ८१ टक्के गुण मिळाले. दोनदा अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले. मात्र, नैसर्गिक उपचाराद्वारे त्यावर मात करताना त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला. आता ते इतरांवर निसर्गाेपचार करतात. हे करत असतानाच त्यांनी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स विषयात बी़ए़ची पदवी घेतली. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे.