शहराचा कालबद्ध विकास करणार : गिरीश बापट
By admin | Published: February 25, 2017 02:32 AM2017-02-25T02:32:49+5:302017-02-25T02:32:49+5:30
महापालिका निवडणुकीत जनतेपुढे भाजपाने वचननामा मांडला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून दिले आहे
पिंपरी : महापालिका निवडणुकीत जनतेपुढे भाजपाने वचननामा मांडला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून शहराच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी येथे शुक्रवारी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यापार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्रदेश सदस्या उमा खापरे, एकनाथ पवार यांच्यासह भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
‘‘उद्योगनगरीत भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी ‘एक हजारी भाग’ ही पद्धत राबविली. संघटनेच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाचे कमळ फुलले आहे. यापुढे एकही दिवस वाया न घालवता विकासकामे करण्यास सुरुवात करणार आहोत. विमानतळ, मेट्रो, रेडझोन, औद्योगिक प्रदर्शन, पीएमपी बस खरेदी करणे, लोणावळा-दौंड तिसरा रेल्वे मार्ग, रस्ते रुंद करणे, विकास आराखड्याची १०० टक्के अंमलबजावणी अशी विविध कामे नियोजनानुसार केली जातील. तीन महिन्यांतून एकदा विकासकामांचा आढावा घेतला जाईल. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास करणार आहे, असे बापट यांनी सांगितले. या वेळी लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेचा कारभार पारदर्शक करणार असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)