विकासात ‘एनएसएसओ’ महत्त्वपूर्ण
By admin | Published: June 28, 2017 04:03 AM2017-06-28T04:03:16+5:302017-06-28T04:03:16+5:30
देशाच्या विकासासाठी पूरक व विश्वसनीय माहिती संकलनाचे कार्य गेली ७५ वर्ष एनएसएसओ जबाबदारीपूर्वक करत आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाच्या संचालिका सुप्रिया रॉय यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : देशाच्या विकासासाठी पूरक व विश्वसनीय माहिती संकलनाचे कार्य गेली ७५ वर्ष एनएसएसओ जबाबदारीपूर्वक करत आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाच्या संचालिका सुप्रिया रॉय यांनी केले.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्यांतर्गत पुणे विभागाच्या नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने आकुर्डी येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एस. सायलवार, दिल्ली मुख्यालयाचे उपसंचालक मूलचंद भास्कर, राज्याच्या अर्थ आणि सांख्यिकी विभागाचे सहसंचालक वामन घुले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने ७५ व्या वर्षात पदार्पण करताना नवीन सर्वेक्षण कार्यक्रमाला येत्या १ जुलैपासून सुरुवात होत आहे. वर्षभर चालणाऱ्या या सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण आणि आरोग्य विषयक कौटुंबिक खर्च आणि स्वच्छ भारत अभियान याबाबत माहिती संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आकुर्डी येथील कार्यालयात तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रास्ताविक करताना रॉय म्हणाल्या, ‘‘शासनाच्या विविध योजना आणि विकासात्म धोरणांसाठी माहिती संकलन करण्याची जबाबदारी आमच्यावर असते. योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी खात्याकडून मिळालेली माहितीही अचूक आणि सत्य असण्याची गरज असते. यासाठीच प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि माहिती संकलनाचे काम करणार आहेत, त्यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण क्षेत्रातील गळती व त्यामागील कारणे, आरोग्य सुविधांचा आढावा अशा विविध बाबींचे संकलन करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग केंद्र शासनाच्या धोरण निश्चितीसाठी उपयोगी पडत असते.’’
डॉ. सायलवार यांनी मार्गदर्शन करताना सांख्यिकीय एनएसएसओकडून संकलित करण्यात येत असलेली माहिती उपयुक्त आणि विश्वसनीय असल्याचे सांगितले. या संकलित माहितीचा उपयोग शासनाचे विविध विभाग करून घेतात. भारतीय अर्थव्यवस्थेत ही संकलित माहिती महत्त्वाची भूमिका बजावते, असे सांगितले. या वेळी मूलचंद भास्कर आणि वामन घुले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले,
तर एम. एस. चोरघडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी एस. जी. देवळीकर, सांख्यिकी अधिकारी महादेव कुलाळ व आनंदसागर रोटे यांनी परिश्रम घेतले.