विकासकामे वृक्षांच्या मुळावर
By admin | Published: May 11, 2015 06:18 AM2015-05-11T06:18:48+5:302015-05-11T06:18:48+5:30
शहरातील आदर्शवत ठरविण्याचे प्रयत्न सुरू असलेल्या सांगवी - रावेत- किवळे या बीआरटी रस्त्यालगत उद्यान विभागाने मेहनतीने झाडे लावली, जगवली.
अंकुश जगताप, पिंपरी
शहरातील आदर्शवत ठरविण्याचे प्रयत्न सुरू असलेल्या सांगवी - रावेत- किवळे या बीआरटी रस्त्यालगत उद्यान विभागाने मेहनतीने झाडे लावली, जगवली. मात्र गेल्या २ वर्षांत यापैकी थोडीथोडकी नव्हे; तर तब्बल ५५४ झाडे गायब झाल्याचे लोकमतच्या पाहणीदरम्यान उघड झाले आहे. कधी दुकान, हॉटेल, वर्कशॉप, गोदामासमोर अडथळा ठरते म्हणून, कधी बांधकाम व्यावसायिक व जागामालकाला जागेपर्यंत पोहोचण्यास अडसर वाटतो म्हणून तर कधी भूमिगत केबल गाडणे, पदपथ करणे आदी विकासकामांसाठी तग धरलेल्या झाडांचाही अज्ञातांकडून बळी दिला जात आहे. परिणामी रस्त्यालगतचा असा भाग पुन्हा भकास करण्याचे प्रकार सुरू आहेत.
शहरामध्ये पथदर्शी बीआरटी रस्ता करण्यासाठी सांगवी ते किवळे या रस्त्यावर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हा रस्ताच सर्वप्रथम बीआरटी म्हणून खुला होण्याच्या दृष्टीने सध्या पावले उचलली जात आहेत. हा रस्ता सुखावह दिसावा यासाठी दुतर्फा झाडे लावण्याची जबाबदारी पालिकेच्या उद्यान विभागावर सोपविली होती. त्यानुसार उद्यान विभागाने रोपवाटिकांमध्ये पूर्ण वाढ झालेली ३ ते ७ फूट उंचीची वृक्षरोपांची अडीच वर्षांपूर्वी पावसाळ्यात लागवड केली. त्यामध्ये वड, पिंपळ आदी देशी वृक्षांसह विदेशी प्रजातीच्या अनेक झाडांचा समावेश आहे. विविध दुकानांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची तोड केली आहे.
रक्षक सोसायटी चौक भकास
रक्षक चौक - सांगवी फाट्यापर्यंत सैन्याच्या अखत्यारितील जागा मिळाल्यावर येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीची झाडे काढली किंवा पुनर्रोपण केले. मात्र सध्या काम अद्यापही सुरूच असल्याने रस्त्यालगत टपाल कार्यालय ते जिल्हा उरो रुग्णालयासमोर डांबरीकरण व सैन्याची सीमाभिंत यामध्ये फक्त ४ फुटांची जागा शिल्लक ठेवली आहे. त्यावरही पदपथाचे ब्लॉक बसविण्यात आले आहेत. परिणामी येथे एकही झाड नसून रस्ता भकास झाला आहे. फक्त सांगवी फाटा चौकात एकच जुने झाड उरले आहे.
दिलासादायक
सांगवी - किवळे बीआरटी रस्त्यालगत काही गावांमधील ठरावीक ठिकाणी वृक्षांचे चांगले जतन झाले असून त्यामुळे पर्यावरण दृष्टीने दिलासादायक स्थिती आहे. ताथवडेच्या निंबाळकर नगर येथे बीआरटी स्थानकालगत दुतर्फा वड, पिंपळाची अनेक झाडे सलग जिवंत असून, ती जोमदार वाढली आहेत. त्यामुळे वाटसरूंना कितीही उन्हात येथे सावली मिळते. वाहनचालकांना प्रवासाचा सुखद अनुभव येतो. मुकाई चौक, किवळे ते रावेतच्या भोंडवेवस्तीपर्यंत व्यावसायिक कमी आहेत. त्यामुळे येथेही एका बाजूलाच ११२ झाडे सुस्थितीत डौलाने उभी आहेत.
झाडे नसल्याचा दावा
काळेवाडी फाटा ते डांगे चौकदरम्यान २ वर्षांपासून अनेक झाडे डौलाने उभी होती. मात्र व्यापाऱ्यांनी थाटलेल्या दुकानांपुढील झाडे दिसेनाशी कशी झाली, याबाबत विचारणा केली असता; आम्ही आहे, तेव्हापासून येथे झाडे नव्हती असे स्पष्टीकरण दुकानदार देत आहेत. तर झाडे लावतानाच अनेक व्यावसायिकांनी तेथे झाडे लावण्यास उद्यान विभागाला मज्जाव केल्याने तेथे खड्डे बुजवून डांबर फासण्याचा प्रकार झाल्याची माहिती थेरगावच्या रहिवाशांनी दिली आहे.
रहिवाशांची उदासीनता
४वृक्षवल्ली आम्हा सोयरे... असा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिलेल्या संत तुकाराममहाराजांची ही जन्म आणि कर्मभूमी आहे. त्या विचाराने जुन्या पिढीतील अनेकजण वृक्षलागवड व जतन करीत असतात. मात्र सध्याच्या पिढीमध्ये वृक्षलागवडीबाबत कमालीची उदासीनता असल्याचा प्रत्यय बीआरटी रस्त्यालगत दिसून आला. उद्यान विभागाने लावलेल्या झाडांव्यतिरिक्त रस्त्यालगत एकाही रहिवाशाने वृक्षारोपण केले नसल्याचे निराशाजनक चित्र अनुभवास आले. वृक्षलागवड मोहिमेत सहभागी करून त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
रस्तागायब झाडे
किवळे मुकाई चौक ते रावेत बास्केट ब्रिज४४
बास्केट ब्रिज ते डांगे चौक८३
डांगे चौक ते रक्षक चौक१४०
रक्षक चौक ते जगताप डेअरी चौक०
जगताप डेअरी चौक ते काळेवाडी फाटा३७
काळेवाडी फाटा ते डांगे चौक११६
डांगे चौक ते ताथवडे ५०
ताथवडे ते बास्केट ब्रिज३९
रावेत ते किवळे४५
हे करू शकतो आपण
४घरापुढील झाडाला उन्हाळ्यात बादलीभर पाणी घाला.
४झाडे दगावलेल्या खड्ड्यात पुनर्लागवड करा.
४झाड पूर्ण वाढेपर्यंत ते जतन करण्याचा प्रयत्न करा.
४दोन झाडांदरम्यानच्या जागेतूनच मिळकतीसाठी रस्ता ठेवा.
४झाडांना इजा पोहोचविणारांची माहिती प्रशासनाला कळवा.