लाेणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:53 AM2019-09-29T11:53:19+5:302019-09-29T11:54:43+5:30

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

devotees visit the Ekweera Devi in Lonavala | लाेणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

लाेणावळ्यातील एकविरा देवीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

Next

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भल्या पहाटेपासून देवीचे व घटाचे दर्शन घेण्याकरिता स्थानिकासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविकांनी गर्दी केल्याने गडाचा परिसर भाविकांनी गजबजला होता.

मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी सपत्नीक देवीचा अभिषेक केल्यानंतर सकाळी साडेसात वाजता देवीचे घट बसविण्यात आले. नवरात्र उत्सवातील देवीचे मनोहरी रुप व घटाच्या माळेचे दर्शन घेण्याकरिता भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये गडावर नवचंडी पाठाचे पठण करण्यात आले. नवरात्रीचे नऊ दिवस गडावर दर्शनाकरिता भाविकांची गर्दी होणार आहे. याकरिता प्रशासकिय पातळीवर तयारी करण्यात आली असून भाविकांना सुलभतेने दर्शन मिळावे याकरिता प्रशासकिय समिती व ग्रामीण पोलीस प्रयत्नशिल असणार असल्याचे समितीच्या वतीने कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे यांनी सांगितले.

वाहतुक कोंडीने भाविक हैराण 

एकविरा देवीची घटस्थापना व नवरात्र दर्शनाकरिता भाविकांनी भल्या पहाटे गडावर मोठी गर्दी केल्याने गड परिसरात प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. गडावरील वाहनतळ लहान असल्याने भाविकांनी रस्त्यांमध्ये वाहने उभी केल्याने कोंडीत भर पडली. त्यातच सकाळच्या सुमारास पोलीस यंत्रणा उपलब्ध नसल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. पाच दहा मिनिटाच्या अंतराकरिता तासभर गेल्याने अनेकांना सकाळची आरती मिळाली नाही. नवरात्र उत्सवात प्रशासकिय समिती व पोलीस प्रशासन यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे.

गड पायर्‍याची दुरुस्ती 

कार्ला गडाच्या पायर्‍या अनेक ठिकाणी तुटल्याने भाविकांना धोका होऊ शकतो असे वृत्त लोकमतने मागील आठवड्यात प्रसिध्द केले होते. याची दखल घेत भारतीय पुरातत्व विभागाने पायर्‍याची डागडुजी करुन घेतली असून एकठिकाणी पडलेली सुरक्षाभिंत देखिल बांधली आहे. यात्रेपुर्वी काम झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
 

Web Title: devotees visit the Ekweera Devi in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.