चिंचवडमध्ये देववाणी अन् देवगाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:18 AM2018-10-31T02:18:06+5:302018-10-31T02:18:44+5:30

भारतीय चित्रपट संगीतातील प्रसिद्ध संगीतकार व शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार पंडित यशवंत देव यांची देववाणी आणि देवगाणी चिंचवडला रंगली होती.

Devwani and Devwani in Chinchwad ... | चिंचवडमध्ये देववाणी अन् देवगाणी...

चिंचवडमध्ये देववाणी अन् देवगाणी...

googlenewsNext

पिंपरी : भारतीय चित्रपट संगीतातील प्रसिद्ध संगीतकार व शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार पंडित यशवंत देव यांची देववाणी आणि देवगाणी चिंचवडला रंगली होती. औचित्य होतं, नादब्रह्म परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या पंडित यशवंत देव यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्याचे. अवीट गोडीची देवगाणी आणि देववाणी शहरवासीयांना अनुभवण्यास मिळाली होती.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ५ नोव्हेंबरचा २००१ चा दिवस हा भारतीय मराठी चित्रपट संगीतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस होता. औद्योगिकनगरीपासून सांस्कृतिकनगरी असा लौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात देवगाणी आणि देववाणीचा अनुभव रसिकांना आला. या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यासाठी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे व प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित होत्या.

शब्दप्रधान गायकीचे शिल्पकार देव यांनी अनेक गीतांना संगीतसाज चढवून भावसंगीताचे विश्व समृद्ध केले. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात देवगाणी सादर झाली. त्यामध्ये देव यांच्या समवेत चिंचवडची आश्वासक गायिका सावनी रवींद्र सहभागी झाली होती. या वेळी संयोजक डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे व नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी...’, ‘असेन मी नसेन मी...’, ‘अखेरचे येतील माझ्या...’, ‘दिवस तुझे हे फुलायचे...’, ‘स्वर आले दुरुनी...’, ‘तिन्ही लोक आनंदाने...’, ‘जीवनात ही घडी...’ अशी अवीट गोडीची गाणी सादर केली होती. तसेच गाण्यांच्या आठवणीही देव यांनी सांगितल्या होत्या. देवगाणी संपल्यानंतर गौरव सोहळा झाला.

आशा भोसले यांनी यशवंत देव यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, ‘‘यशवंत देव हे महान संगीतकार आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याबरोबर मला अधिक काम करता आले नाही. आम्ही त्यांना नाना म्हणून संबोधित असू. त्यांचे एक गाणे मला गायला मिळावे म्हणून मी भांडले. ते गाणे होते, ‘विसरशील खास मला, दृष्टीआड होता...’ या गाण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता. त्यातून हा संगीतकार किती महान आहे, हे दिसून येते.’’

आघाडीच्या गायिका सावनी रवींद्र म्हणाल्या, ‘‘मी १९९९ पासून पंडितजींच्या तालमीत तयार झाले. आई मला त्यांच्याकडे गाणे शिकायला घेऊन जात असे. पुढे ते माझे गुरू झाले. माझ्या आवाजाविषयी त्यांना कौतुक होते. मी त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम सादर केले. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे...’ अशी अनेक गाणी मी त्या वेळी कार्यक्रमात सादर करीत असे. त्यांच्यामुळेच मी आज चांगली कलावंत, गायिका होऊ शकले.’’

आठवण सांगताना डॉ. रवींद्र घांगुर्डे म्हणाले, ‘‘सुधीर फडके, यशवंत देव, श्रीनिवास खळे ही भारतीय संगीतातील घराणी आणि विद्यापीठे आहेत. त्यातील देव आणि नादब्रह्म परिवाराचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यातूनच पंचाहत्तरीचा सोहळा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले होते. त्यांचा यथोचित गौरव आशातार्इंच्या हस्ते करण्यात आला. संगीत क्षेत्रातील देवमाणसांचा गौरव हा अपूर्व सोहळा शहरवासीयांनी अनुभवला.’’

Web Title: Devwani and Devwani in Chinchwad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.