आमदार पुत्राला हटकणाऱ्या पोलीस अधिकारी धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 06:08 AM2018-07-10T06:08:23+5:302018-07-10T06:08:34+5:30
कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्रमैत्रिणींबरोबर मागील आॅक्टोबरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाºया आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला खात्यांतर्गत कारवाईस सामोरे जावे लागले आहे.
पिंपरी (पुणे) : कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्रमैत्रिणींबरोबर मागील आॅक्टोबरमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाºया आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला खात्यांतर्गत कारवाईस सामोरे जावे लागले आहे. यापुढे लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट वर्तन करू नये, अशी सक्त ताकीदही देण्यात आली.
२१ आॅक्टोबर २०१७ रोजी शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन मध्यरात्री एकच्या सुमारास कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी ग्रुपला हटकले. त्या वेळी आमदारपुत्राने ‘मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाहीत’ असे पाटील यांनाच दटावले. पोलिसांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाटील यांची तक्रार केली. तसेच मुलाच्या कानफटात मारली, असाही आरोप केला. त्याची गंभीर दखल घेत त्यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली.
लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून पोलीस अधिकाºयांना अशा मानहानीकारक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होत असल्याची चर्चा शहरात आहे.