बक्षीस वितरणासाठी ‘ढोल बजाओ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:30 AM2018-09-18T02:30:47+5:302018-09-18T02:31:00+5:30

महापालिकेसमोर निषेध; राष्ट्रवादीची स्टंटबाजी असल्याचा भाजपाचा आरोप

'Dhol Bazo' for the prize distribution | बक्षीस वितरणासाठी ‘ढोल बजाओ’

बक्षीस वितरणासाठी ‘ढोल बजाओ’

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०१७ मध्ये घेतलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले नाही. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ढोल बजाओ आंदोलन केले.
महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाविले. ढोलच्या दणदणाटाने पालिकेचा परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मयूर कलाटे, राजू बनसोडे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, गणेश भोंडवे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास पालिकेसमोर ढोल वाजविले.
विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने गतवर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत ६२ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३८ मंडळांना बक्षीस जाहीर झाले. त्यासाठी केवळ पाच लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु, अद्यापही बक्षिसाचे वितरण करण्यात आले नाही. न्यायालयाच्या निर्णयाचे कारण दिले जाते. यामध्ये काहीतरी तोडगा काढणे अपेक्षित होते. अनेक न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. त्याचे पालन महापालिकेकडून केले जात आहे का. सत्ताधारी भाजपाला गणेश मंडळांना बक्षीस देण्याची प्रथा मोडीत काढायची आहे. पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हलदेखील त्यांनी बंद पाडला आहे. संस्कृती रक्षक असलेल्या सत्ताधाऱ्यांना परंपरा मोडीत काढायच्या आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.’’ संजोग वाघेरे म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीने सुरू केलेली चांगली परंपरा सत्ताधारी भाजपा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे.’’

गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीसवितरण आणि पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल होणार असल्याचे जाहीर करूनही राष्ट्रवादी काँग्रेसने
आंदोलन केले. प्रसिद्धीसाठी ही केवळ स्टंटबाजी आहे. विरोधकांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा महापालिकेच्या वतीने सर्वपक्षीय एकमत ठेवून उपक्रमात योगदान देणे गरजेचे आहे. - एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते

Web Title: 'Dhol Bazo' for the prize distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.