डायबेटिस, हाय बीपी पेशंटला महागाईचा ‘डोस’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:48 AM2019-01-24T02:48:41+5:302019-01-24T02:48:48+5:30
मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- प्रकाश गायकर
पिंपरी : मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. औषधांच्या वाढलेल्या किमतीवर सेवा व वस्तूकर लावून या औषधांची किंमत सुमारे ७ ते १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांवर दरमहा साधारणत: अडीच ते तीन हजार रुपये खर्च होत होता. मात्र आता औषधांच्या किमती वाढल्याने त्यामध्ये ३०० ते ३५० रुपयांची वाढ होणार आहे. अनेक कंपन्यांनी औषधांच्या स्वरूपामध्येही बदल केल्याचे दिसून येते. तसेच अनेक कंपन्यांनी गोळ्यांचे नाव तेच ठेवून आवरण व त्यातील घटक बदलले आहेत.
उच्च रक्तदाबाच्या टेमसीन ४०, प्रोलेमेट एएम ५०, प्रोलमेट एस्क्स ५०, इरिटेअल ट्रिओ, टेमसन सीटी ४० या औषधांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर मधुमेहावरील ग्लिमीसेव्ह एम १, अॅफोग्लिप एम ५५०, इस्टामेट क्लिझियो ट्रायो २ अशा वेगवेगळ्या औषधांच्या किमती वाढल्याने आजाराने आधीच बेजार झालेल्या रुग्णांना महागाईच्या झळा बसत आहेत. मधुमेहाबरोबरच उच्च रक्तदाबाची औषधे महागल्याने रुग्णांना घरखर्च करताना मोठी कसरत करावी लागत आहे. औषधे विकत घेण्यासाठी दरमहा ३०० ते ३५० रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना औषध खरेदी करताना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
>कंपन्यांनी अनेक औषधांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब या औषधांचा समावेश आहे. या आजारांवरील औषधांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे. अनेक कंपन्यांनी आपलीच औषधे खरेदी करावीत यासाठी गोळ्यांच्या आवरणामध्ये व कंटेन्टमध्येही बदल केले आहेत.
- विवेक तापकीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे जिल्हा