दिघीकरांनी काढली रात्र जागून

By admin | Published: November 24, 2015 12:54 AM2015-11-24T00:54:21+5:302015-11-24T00:54:21+5:30

येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर,

Dighiqar woke up the night | दिघीकरांनी काढली रात्र जागून

दिघीकरांनी काढली रात्र जागून

Next

दिघी : येथील काटे वस्ती विनायक पार्क, होरीझन शाळा, कृष्णानगर, गोल्डन बेकरी, विजयनगर, बी. यू. भंडारीसारख्या उच्चभ्रू सोसायट्या व इतरत्र भागातील घराघरांत कुठे गुडघाभर, तर कुठे कमरेएवढे पाणी साचले. रात्रभर जागरण करीत व घरातील पाण्याचा उपसा करीत दिघीकरांनी रात्र घालवली. पावसाळी गटार नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
काटेनगर, विजयनगर परिसरातील विनायक पार्क भागातील रस्त्यावरची विद्युत विभागाची डीपी पडली आहे. या भागातील लालचंद बाबूलाल परदेशी, किसन लिम्बडकर, संजय मोरे अनेकांच्या घरात व घराच्या कानाकोपऱ्यात पाणीच पाणी झाले आहे. या भागातील घरा-घरांत पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यावरही पाणीच पाणी वाहत असलेले दिसून आले. याच परिसरात असलेल्या होरीझन शाळेजवळील मुरलीधर लोखंडे यांच्या घरात जवळपास कमरेइतके पाणी साचल्यामुळे अख्खा परिवार रात्रभर पाणी काढत राहिला. तरीही दुपारी बारापर्यंत पाणी हटवण्याची प्रक्रिया सुरूच होती. डोंगर भागातून मोठा उतार असल्यामुळे उंचावरून वेगाने वाहणारे पाणी थेट त्याच वेगात खाली येते. हे थेट आलेले पाणी वाहणारी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथून आलेले पाणी बी यू भंडारी, वाटिका, स्पार्कल अ‍ॅव्हेन्यू या उच्चभ्रू सोसायट्यांकडे वळते होते. याच भागातील बी यू भंडारी सोसायटीतील प्लॉट क्र ६८ची भयंकर दयनीय अवस्था झाली असून, येथील तळमजला भागातील प्रत्येक सदनिकेत पाणीच पाणी झाले आहे. प्रत्येक पावसाळ्यात होणारी ही परिस्थिती या भागातील नाागरिकांनी अनुभवली असून, त्याच्यावर कायमचा उपाय होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी नोंदवल्या, तर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शेंडगे यांनी सांगितले की, डोंगराकडून आलेले पाणी वाहण्यासाठी मोठा ओढा होता. तो ओढाच नष्ट करून त्यावर उंच इमारती उभ्या केल्या आहेत. हाच नैसर्गिक ओढा प्रवाहित असता तर असा भयंकर प्रसंग आमच्यावर आला नसता. दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, संतोष बबन वाळके, विश्वकांत वाळके आदींनी मदत केली.
दिवसभर गारठा जाणवत होता. अचानक पाऊस आल्याने सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
तसेच बसथांब्यावरही अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांना भिजण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याने प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले. निवारा शेडचाही वापर करता आला नाही.(प्रतिनिधी)

Web Title: Dighiqar woke up the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.