संमेलनातून श्रमिकांच्या साहित्यास दिशा

By admin | Published: December 28, 2015 01:17 AM2015-12-28T01:17:15+5:302015-12-28T01:17:15+5:30

श्रमसंस्कृती असणाऱ्या शहरात साहित्य संस्कृती चांगल्या पद्धतीने रुजत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पिंपरी-चिंचवडमधील श्रमिकांच्या साहित्यास दिशा मिळेल

The direction of the workers' literature from the meeting | संमेलनातून श्रमिकांच्या साहित्यास दिशा

संमेलनातून श्रमिकांच्या साहित्यास दिशा

Next

पिंपरी : श्रमसंस्कृती असणाऱ्या शहरात साहित्य संस्कृती चांगल्या पद्धतीने रुजत आहे. अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाने पिंपरी-चिंचवडमधील श्रमिकांच्या साहित्यास दिशा मिळेल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे संमेलनपूर्व संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित संमेलनात डॉ. मोरे बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर, मसापचे शाखाध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘‘साहित्य संमेलनाची वातावरणनिर्मिती सुरू आहे. मॉन्सूनपूर्व मॉन्सून येत असतो, तसे हे संमेलन आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर रुजू झाल्यानंतर मी वर्षभर २९० कार्यक्रम केले. संमेलनाध्यक्ष एक वर्ष स्थापित केलेल्या गणपतीसारखा असतो, अशी टीका काही लोक करतात. मात्र, संमेलनाध्यक्ष कोणत्या उंचीचा आहे, हे त्याच्या कार्यकर्तृत्वातून दिसते.’’
डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘माणसाने निर्माण केलेले स्वप्न म्हणजे देवत्व होय. संगीत, नाट्य या कलांच्या अभिव्यक्तीचे पूर्णत्व म्हणजे देवत्व होय. भाषांपलीकडे जाऊन विधायक उपक्रम राबविण्याचे काम साहित्य संमेलनाची मंडळी करीत आहेत.’’
वैद्य म्हणाल्या, ‘‘भाषेसाठी होणाऱ्या जगभरातील सोहळ्यांपैकी सर्वांत मोठा सोहळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी माणसांना वाद घालण्याची सवय आहे. चांगले होण्यासाठी वादही आवश्यक असतात. वाद असेल, तर संवाद प्रबळ होतो. त्यामुळे वाद होण्यात काही गैर नाही. मराठीपुढील काळ अवघड आहे, तरुणांना मराठी साहित्याकडे वळविण्याची गरज आहे.’’ डॉ देखणे म्हणाले, ‘‘माझीया जातीचे भेटो कुणी...’ या संतवचनाचा अनुभव आज येत आहे. कारण १९८४ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची पहिली शाखा शहरात स्थापन झाली. देहू-आळंदीतून संतांच्या पालख्या ज्या गावातून निघतात, तिथेच त्यांचा पहिला मुक्काम असतो. त्यापूर्वी प्रस्थान सोहळा असतो. १५ जानेवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पालखीचे प्रस्थान करण्याचा आज सोहळा आहे. या शहरात श्रमसंस्कृती उजळली, शब्द संस्कृती तेजाळली आहे. कामगाराचे साहित्य निर्मितीचे हात असतात, तसेच साहित्यिकांचे हातही साहित्य निर्मितीचे असतात. शब्द सृजनाचा सांगाता साहित्य आहे, तर वस्तुसृजनाचा प्रजापती कामगार आहे. जाणीव जेव्हा लौकिक अर्थाला प्राप्त होते त्यास अनुभव म्हणतात, तीच जाणीव अलौकिक असते, तिला अनुभूती म्हणतात. जाणिवेचे सहजसुंदर दर्शन साहित्य आहे.’’
या वेळी ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. गिरीश प्रभुणे, अरुण शेवते, बशीर मुजावर, मधू जोशी, प्रकाश रोकडे, डॉ. वंदना घांगुर्डे, अरुण बोऱ्हाडे, अमृत पऱ्हाड, रमेश डोळस, अशोक त्रिभुवन, अशोक कोठारी, निशिकांत गोडबोले, मकरंद आंबेकर, विष्णू जोशी, सुभाष सरीन, मुरलीधर जावडेकर, चित्रकार मनोहर, शांताराम हिवराळे, संजय पवार यांचा गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: The direction of the workers' literature from the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.