पूजा खेडकरला दिले पिंपरीच्या रुग्णालयातूनही दिव्यांग प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:50 AM2024-07-16T10:50:38+5:302024-07-16T10:52:04+5:30

पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे अनेक कारनामे उघड होत आहे. त्यातच मंगळवारी खेडकर यांनी ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचा प्रकार उघड झाला.

Disability certificate was also given to Pooja Khedkar from Pimpri hospital | पूजा खेडकरला दिले पिंपरीच्या रुग्णालयातूनही दिव्यांग प्रमाणपत्र

पूजा खेडकरला दिले पिंपरीच्या रुग्णालयातूनही दिव्यांग प्रमाणपत्र

पिंपरी : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यानंतर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती  रुग्णालयानेही त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे सोमवारी  उघड झाले आहे. 

 पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे अनेक कारनामे उघड होत आहे. त्यातच मंगळवारी खेडकर यांनी ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान, खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले होते. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली असून, जिल्हा शासकीय रुग्णालयातून २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर आता वायसीएम रुग्णालयातून ऑगस्ट २०२२ मध्ये ७ टक्के दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामध्ये खेडकर यांना ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे नमूद केले आहे. 

दरम्यान, पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याने दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून त्या संदर्भातील अहवाल मागवला आहे.

औंध रुग्णालयाने नाकारले होते

पूजा खेडकर यांनी पिंपरी- चिंचवड मधील औंध सर्वोपचार रुग्णालय आणि पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.

त्यापैकी औंध रुग्णालयाने त्यांचा अर्ज नाकारला. तर वायसीएम रुग्णालयाने त्यांना प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे.

पूजा खेडकर यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यामध्ये ७ टक्के अस्थिव्यंग असल्याचे दिसून आले. त्यानुसार, त्यांना ऑगस्टमध्ये दिले आहे.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी-चिंचवड.

पूजा खेडकर तूर्तास वाशिममध्येच

वाशिम : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कामकाजाच्या नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, या आठवड्यात त्या अकोला येथे न जाता वाशिममध्येच कामकाज पाहणार आहेत. पुढील आठवड्यात अकोला येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रशिक्षण घेतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

समितीसमोर बाजू मांडेन - पूजा खेडकर

 माझ्यावर व कुटुंबावर होत असलेल्या आरोपाबाबत मीडियासमोर किंवा सार्वजनिक बोलण्यास मी अधिकृत नाही. मला तशी परवानगी नाही. जे काही माझे स्पष्टीकरण असेल ते समितीसमोर मांडेल, असे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी सांगितले.

Web Title: Disability certificate was also given to Pooja Khedkar from Pimpri hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.