अपंगांच्या पदरी उपेक्षा

By admin | Published: April 24, 2017 04:42 AM2017-04-24T04:42:40+5:302017-04-24T04:42:40+5:30

प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्याचा योग्य दाम, या गोष्टी समाजात गरजेच्या ठरतात. परंतु गेल्या अनेक वर्षांत रोजगारनिर्मितीवर भर दिला जात

Disadvantages of disabled people | अपंगांच्या पदरी उपेक्षा

अपंगांच्या पदरी उपेक्षा

Next

भोसरी : प्रत्येकाच्या हाताला काम आणि त्याचा योग्य दाम, या गोष्टी समाजात गरजेच्या ठरतात. परंतु गेल्या अनेक वर्षांत रोजगारनिर्मितीवर भर दिला जात असतानाही बेरोजगारीची समस्या मात्र कायम आहे. अपंग बांधवांना तर नेहमीच उपेक्षेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. विविध सरकारी कार्यालये, सरकारी व खासगी दवाखाने, उद्याने, स्वच्छतागृहे अशा ठिकाणी अपंगांना जाण्यासाठी सुविधा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली नसल्याने प्रत्येक वेळी अपंग बांधवांना इतरांकडे मदतीची याचना करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शहरातील अपंगांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक केंद्र, तसेच विविध उपक्रम राबवण्यातही महापालिका प्रशासनाची उदासीनता दिसून येते.
भोसरीतील दुय्यम उपनिबंधक कार्यालय, कर संकलन केंद्र, पोस्ट आॅफिस, पोलीस स्टेशन, सरकारी बँक, जीवन बिमा निगम, टेलिफोन कार्यालय, ई सेवा केंद्रे अशा विविध ठिकाणी अपंग बांधवांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कामे घेऊन येणाऱ्या अपंग बांधवांच्या सोयीसाठी लिफ्ट किंवा रॅम्पची व्यवस्था असायलाच हवी, असा हायकोर्टाचा आदेश असला, तरी त्याची सर्रास पायमल्ली सुरू आहे. अनेक कार्यालयांमध्ये रॅम्प (सरकत्या जिन्यांची) व्यवस्थाच नसल्याने अपंगांना अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचताना प्रत्येक पायरीवर अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते आहे.
सरकारी योजनांची जेथून अंमलबजावणी होते, त्या सरकारी कार्यालयांमध्येच अपंग बांधवांप्रतिची अनास्था प्रकर्षाने पहावयास मिळते. सरकारी योजनांचे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी इतरांप्रमाणेच अपंग बांधवांनाही सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवावे लागतात. सुदृढ व्यक्तीपेक्षा त्यांची परिस्थिती वेगळी असली, तरी त्याकडे डोळेझाक करून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची खंत अपंग बांधव व्यक्त करतात. अपंग बांधवांसाठी लिफ्ट किंवा रॅम्पची सोय असायलाच हवी असा सरकारचा १९९५ चा आदेश असला, तरी त्याची आजतागायत पायमल्ली सुरू आहे. (वार्ताहर)
हौशी कलावंतांचे अनेक संघ आपली कला नव्याने प्रेक्षकांसमोर सादर करीत असतात. परंतु, असे असले तरी या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र खरी आहे की, शहरात अपंग मुला-मुलींंच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले नाही. मुळातच सहानुभूती नको असलेला आणि अंगी तुलनेने इतरांपेक्षा चांगले कलागुण असलेल्या या युवा वर्गाला सांस्कृतिक क्षेत्रात डावलण्यात आल्याची भावना अपंग कलाकार व्यक्त करतात.(वार्ताहर)

Web Title: Disadvantages of disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.