पदपथ उखडल्याने पादचाऱ्यांची गैरसोय

By Admin | Published: May 6, 2017 02:20 AM2017-05-06T02:20:09+5:302017-05-06T02:20:09+5:30

काही महिन्यांपासून वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौक ते संत नामदेव चौकादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

Disadvantages of the pedestrians by hoisting the sidewalk | पदपथ उखडल्याने पादचाऱ्यांची गैरसोय

पदपथ उखडल्याने पादचाऱ्यांची गैरसोय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : काही महिन्यांपासून वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौक ते संत नामदेव चौकादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्याकरिता सुस्थितीत असणारा पदपथ उखडून टाकल्यामुळे व राडारोडा अस्ताव्यस्त पसरल्यामुळे नागरिकांना त्यावरून चालणे अशक्य झाले आहे.
निगडी येथील अप्पूघर ते डांगे चौक दरम्यान पाणीपुरवठ्यासाठी मोठी वाहिनी टाकण्याचे काम नागपूरच्या एका कंपनीकडे पालिका प्रशासनाने सोपविले आहे.
या कामासाठी वाल्हेकरवाडी येथील मुख्य चौकातून जलवाहिनी टाकण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्याकरिता काही महिन्यांपूर्वी पदपथावर बसविण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक उखडून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. उखडून टाकण्यात आलेले ब्लॉक रस्त्याच्या बाजूने अस्ताव्यस्त पडलेले आहेत. तर बरेच ब्लॉक चोरीस गेले आहेत. ठेकेदाराने ब्लॉक काढताना दक्षता घेतली असती आणि ते व्यवस्थित ठेवले असते, तर त्याचा पुनर्वापर करता आला असता. परंतु खर्चामध्ये काटकसर करण्याऐवजी नागरिकांच्या पैशांच्या उधळपट्टीचे धोरण पालिकेने तयार केले आहे काय, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

दुर्लक्ष : पेव्हिंग ब्लॉक चोरीला

ठेकेदाराने स्वत:चे काम पूर्ण करण्यासाठी पदपथाची केलेली दुरवस्था पूर्वस्थितीत करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून त्यांनी याकरिता दुसरी निविदा न काढता स्वत:च्या पैशांनी करावी, अशीही मागणी केली जात आहे. चांगल्या स्थितीत असणारे चोरीला गेलेले ब्लॉक काही नागरिकांच्या घरासमोर दिसून आले आहेत.


मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले काम आम्हाला त्रासदायक ठरत असून याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. आमची स्वमालकीची दुकाने रस्त्याच्या लगत आहेत. पदपथ खोदून ठेवल्यामुळे ग्राहकांना जा-ये करणे अवघड होत आहे. काम त्वरित पूर्ण करून उखडलेला पदपथ पूर्ववत करावा
- सचिन शिवले, हॉटेल व्यावसायिक

आजपर्यंत वाल्हेकरवाडीचा विकास या ना त्या कारणाने रखडलेला आहे. कसे तरी काही महिन्यांपूर्वी पदपथावर ब्लॉक बसवून नागरिकांची सोय करण्यात आली होती. परंतु जलवाहिनीच्या कामासाठी पदपथ उखडून टाकल्यामुळे आम्हाला जीव मुठीत धरून चालावे लागते.
- बाळासाहेब वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते,वाल्हेकरवाडी

Web Title: Disadvantages of the pedestrians by hoisting the sidewalk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.