आघाडीसाठी पुन्हा चर्चा
By Admin | Published: February 3, 2017 04:14 AM2017-02-03T04:14:55+5:302017-02-03T04:14:55+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरूच आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरूच आहे. त्यामुळे आघाडीविषयी अनिश्चिता निर्माण झाली आहे.
‘‘काँग्रेसबरोबर आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचा दावा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तर, कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नसल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी जाहीर केले. त्यामुळे आघाडीची शक्यता मावळली आहे.
समविचारी पक्षाच्या मताची विभागणी होऊ नये, म्हणून महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, ४० जागांची मागणी केली असताना केवळ २० जागा देण्याचे राष्ट्रवादीने सांगितल्याने जागांच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी झालेल्या बैठकीत चर्चा फिसकटली होती. त्यामुळे दोन्हीही पक्ष स्वबळावर लढणार हे निश्चित झाले होते. मात्र, गुरूवारी अनेक घडामोडी झाल्या. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने यावर आज पुण्यात बैठक झाली.
त्याच वेळी पिंपरी-चिंचवडमधील आघाडीबाबत चर्चा करण्याची सूचना पवार यांनी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना केली होती. त्यानंतर सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सूतावोच केले. मात्र, आघाडीत बिघाडी कायम आहे. ‘आज आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे साठे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)