चर्चा.. भीती...आणि सुटकेचा निःश्वास.. कारण बिबट्या नव्हे ते रानमांजर निघाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 08:48 PM2019-05-16T20:48:39+5:302019-05-16T20:53:57+5:30
सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ...
सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत पाहणी केली. बिबट्या नव्हे तर रानमांजर सदृश्य प्राणी असल्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी वर्तवली. त्यामुळे दोन दिवसांपासून भयभीत असलेल्या स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगवी परिसरात संरक्षण विभागाच्या हद्दीत सोमवारी (दि. १३) बिबट्या निदर्शनास आला असून, त्याबाबत संरक्षण विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे परिपत्रक सीक्यूएई विभागातर्फे जारी करण्यात आले होते. सुरक्षा अधिकारी डी. पी. साना यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. सांगवी पोलीस ठाण्यालाही याबाबत पत्र देण्यात आले. त्यामुळे सांगवी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची बातमी वाºयासारखी पसरली. त्यामुळे वनविभागाचे वनरक्षक विजय शिंदे, वनपाल महेश मेरगेवाड व सांगवीतील वन्यजीव संरक्षण संस्थेचे विनायक बडदे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत गुरुवारी (दि. १६) दुपारी पाहणी केली. बिबट्याच्या पायांचे ठसे अथवा इतर पुरावे या पाहणीदरम्यान आढळून आले नाहीत. प्रत्यक्षदर्शींकडेही याबाबत विचारणा करण्यात आली. बिबट्याशी मिळते जुळते वर्णन या चौकशीत मिळून आले नाही. या भागात रानमांजर असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथे बिबट्या नसून रानमांजर असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सांगवी परिसरात बिबट्या दिसल्याच्या वृत्तास पूर्णविराम मिळाला.
आयटीनगरीच्या परिसरात बिबट्याचे दर्शन
आयटीनगरी हिंजवडीलगत असलेल्या कासारसाई परिसरात स्थानिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. कासारासाई परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आयटीनगरीत पसरली. याच आयटीनगरीला लागून सांगवी परिसर आहे. या परिसरात आयटी तील कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सांगवी परिसरातही बिबट्या निदर्शनास आल्याची चर्चा होती. त्यामुळे येथील आयटीयन्स आणि स्थानिकांमध्ये घबराट होती. मात्र बिबट्या नव्हे तर रानमांजराचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने आयटीयन्स आणि स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मॉर्निंग वॉक, शतपावली करणारे धास्तावले
सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत मोठ्या संख्येने झाडे आहेत. तसेच या परिसरात मुळा नदी आहे. या नदीच्या दुतर्फा दाट झाडे आहेत. त्यामुळे येथे मॉर्निंग वॉकसाठी आणि शतपावलीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. हे नागरिक बिबट्याच्या चर्चेमुळे धास्तावले.