उघड्या नाल्यामुळे आजार फोफावले
By admin | Published: March 21, 2017 05:16 AM2017-03-21T05:16:39+5:302017-03-21T05:16:39+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून पालिका प्रशासन वर्षाला लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करते.
रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून पालिका प्रशासन वर्षाला लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च करते. मात्र म्हणावी तेवढी शहराची स्वच्छता होते काय, हा खरा प्रश्न आहे. शहरात नालेसफाईसाठी वर्षासाठी ठेकेदार नेमलेले असतात; मात्र एकदा किंवा दोनदाच नालेसफाई करून पुन्हा त्याकडे पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शहरातील अनेक नाल्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गवत व घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात काही उघडे नाले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या उघड्या गटारी, नाल्याची साफसफाई न झाल्याने त्या नाल्यात गवत व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांचे प्रमाण वाढले असून डेंगी, मलेरिया, साधा ताप यासारख्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे शहरातील उघडे नाले लवकरात लवकर साफ करण्याची मागणी शहरवासीय करीत आहेत. (वार्ताहर)