थेरगावातील बारणे उद्यानाची दुरवस्था
By admin | Published: May 3, 2017 02:22 AM2017-05-03T02:22:13+5:302017-05-03T02:22:13+5:30
लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नागरिकांचे प्रमुख
थेरगाव : लक्ष्मणनगर येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नागरिकांचे प्रमुख आकर्षण असलेले कारंजे या ठिकाणी कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी डबक्यात घाण पाणी साचून डासांचे प्रमाण या ठिकाणी वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारंजे बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे. तसेच सुरक्षेसाठी उद्यानाच्या भिंतींवर लावलेले लोखंडी कंपाउंड तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणाहून उड्या मारून टवाळखोर मुले आत येत असतात. त्यामुळे येथील सुरक्षा रामभरोसे आहे.
या ठिकाणी लक्ष्मणनगर, गणेशनगर, गुजरनगर, संतोषनगर, १६ नंबर, बेलठिकानगर, पवारनगर आदी परिसरातील नागरिकांची सकाळी उद्यानामध्ये फिरण्यासाठी मोठी वर्दळ असते. तसेच या ठिकाणी व्यायामासाठी आणि योगासनांसाठीही नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. उद्यानातील फुटपाथचे गट्टू तुटलेले आहेत. त्यामुळे चालताना अडथळे येतात. उद्यानामध्ये रोज लक्ष देऊन पूर्ण उद्यानात पाणी मारले जात नसल्याने येथील हिरवळ नाहीशी झाली आहे. अनेक झाडे सुकून गेली आहेत. उद्यानामध्ये हिरवळच राहिलेली नसल्यामुळे नागरिकांना हिरवळीवर बसण्याचा आनंद घेता येत नाही. अनेक ठिकाणी झाडाचा पाचोळा पडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना बसण्यासाठी स्वच्छ जागा राहिली नाही. त्यातच लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी झोपाळा आहे, पण तोही तुटला आहे. झोपाळ्याचे पोल तेवढे दिसत आहेत. अनेक खेळणी तुटल्या असल्यामुळे बालचमूंच्या आनंदावर विरजण पडत आहे. उद्यानातील दिवे, स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व स्वच्छतागृहाच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. तसेच आतमध्ये कसलीही स्वच्छता ठेवली जात नसल्याने नागरिक स्वच्छतागृहामध्ये जाणे टाळतात.
तसेच पिण्यासाठी पाण्याचा नळ बसवलेला आहे. पण त्या नळाला पाणीच नाही. अशी या ठिकाणची वाईट परिस्थिती असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. उद्यानामध्ये टवाळखोर पोरांचा वावर आणि मद्यपान करून येणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने उद्यानातील कोप-यांत दारूच्या बाटल्या, सिगरेट, बिडीची थोटके पडलेली दिसतात. तसेच अनेक ठिकाणी गुटखा खाऊन पिचका-या मारून भिंती रंगवलेल्या आहेत. फिरण्यासाठी आलेल्यांना या गोष्टीचा त्रास होत आहे.
या सर्व गोष्टींकडे उद्यानातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांचे दुर्लक्ष झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सुशोभीकरणात भर घालण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने उद्यानाची निर्मिती केली जाते. परिसरातील नागरिक थकवा घालविण्यासाठी, विरंगुळा म्हणून, तसेच लहान मुलांना मनोरंजन म्हणून या ठिकाणी येतात; पण या गैरसोयीमुळे आणि त्रासामुळे नागरिकांचा हिरमोड होत आहे. उद्यान अधिका-यांनी या गोष्टींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्रास कमी करावा, अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)