टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने वाद; विनयभंगाचे दोन गुन्हे, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:10 PM2021-03-24T12:10:06+5:302021-03-24T12:10:35+5:30
टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने पिंपळे गुरव येथे मंगळवारी वाद झाला.
पिंपरी : टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. २३) वाद झाला. यातून दोन महिलांचा विनयभंग झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या प्रकरणात २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात फिर्यादी यांच्या शेजारी राहणारी महिला फिर्यादीच्या घरात आली. तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा, असे त्या महिलेने फिर्यादीला सांगितले. माझा मुलगा रडायचा बंद झाला की टीव्हीचा आवाज बंद करते, असे फिर्यादीने महिलेला सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेचा पती दारूच्या नशेत तेथे येऊन गैरवर्तन करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तुला आमच्या सांगण्याप्रमाणे येथे राहावे लागेल, मी रिक्षाचालक आहे मला इथले सगळे भाई ओळखतात तुला माझ्याकडून काय पाहिजे असेल तर मला माग, असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली.
दुसऱ्या प्रकरणात २७ वर्षीय फिर्यादी महिला घरी असताना त्यांना आराम करायचा होता म्हणून टीव्हीचा आवाज कमी कर, असे त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन सांगितले. मात्र टीव्हीचा आवाज कमी न करता मोठा केला. त्यानंतर आरोपी हे फिर्यादीच्या घराबाहेर आले आणि फिर्यादीला मारहाण करून गैरवर्तन करून फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण केली.