सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार
By admin | Published: March 22, 2017 03:17 AM2017-03-22T03:17:46+5:302017-03-22T03:17:46+5:30
चांदखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीय जागेवर निवडून आलेल्या विद्यमान सरपंचासह सात सदस्य निवडून आले.
वडगाव मावळ : चांदखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मागासवर्गीय जागेवर निवडून आलेल्या विद्यमान सरपंचासह सात सदस्य निवडून आले. मात्र, सहा महिन्यांच्या आत त्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईची टांगती तलवार
आली आहे.
मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तात्रेय माळी व अनिकेत कांबळे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे या सात जणांच्या विरोधात अपील केले असून, त्याची सुनावणी २३ तारखेला आहे. चांदखेड ग्रामपंचायतीची निवडणूक २४ आॅगस्ट २०१६ रोजी पार पडली. २६ आॅगस्ट रोजी निकाल लागला. या ग्रामपंचायतीत ११ जागा असून, त्यात तीन नागरिकांचा मागासवर्ग, दोन अनुसूचित जमाती व दोन अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आले. या सात जणांनी हमीपत्रात दिल्याप्रमाणे सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे असते. परंतु, संबंधित सदस्यांनी मुदतीत अर्ज दाखल न केल्याने त्यांच्यावर टांगती तलवार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाईची तरतूद असून नुकतेच नगर जिल्ह्यातील ३४६ जणांचे, तर पाचगणीमधील गोडवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह तीन सदस्यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले आहे. (वार्ताहर)