पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस यंत्रणेमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत समन्वयाचे 'विघ्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:08 AM2020-08-21T11:08:45+5:302020-08-21T11:10:09+5:30

पोलिसांकडून कारवाईचा इशारा तर महापालिकेकडून स्वागताची तयारी

'Disruption' of coordination regarding immersion in Municipal Corporation, Police system | पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस यंत्रणेमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत समन्वयाचे 'विघ्न'

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस यंत्रणेमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत समन्वयाचे 'विघ्न'

googlenewsNext
ठळक मुद्देघाटांच्या सज्जतेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम :

नारायण बडगुजर

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवा दरम्यान आगमन तसेच विसर्जन मिरणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नदीवरील घाटांवर गणेश मूर्तीच्या विसर्जनाला देखील मनाईचा आदेश आहे. असे असतानाही शहरातील घाटांची स्वच्छता तसेच डागडुजी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य संभ्रमावस्थेत आहेत. एकीकडे कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात येत असतानाच प्रशासन घाटांची सज्जता करीत आहे. समन्वयाअभावी महापालिका प्रशासनाचा असा गोंधळ होत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच शासनाने उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. आचारसंहिता म्हणून गणेशोत्सव मंडळांनी त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 
सार्वजनिक मंडळांनी मंडपाजवळ कृत्रीम हौद तयार करून किंवा टबमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. तसेच घरगुती गणपतीचे घरातच विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. हौसिंग सोसायट्यांनी देखील अशाच पद्धतीने सोसायटीतच मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी गणेश मंडळांना याबाबत सूचना केल्या आहेत. शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील केले आहे. मिरवणूक काढता येणार नाही, तसेच विसर्जनासाठी घाटांवर कोणत्याही प्रकारची तयारी केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


घाटांवर करणार बॅरिकेडींग

शहरात पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांच्या घाटांवर गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. दरवर्षी या घाटांची डागडुजी व दुरुस्ती करून स्वच्छता केली जाते. तसेच महापालिकेकडून कृत्रीम हौद तसेच इतर सुविधा देखील या घाटांवर उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र गणेश मूर्तींचे विसर्जन घाटांवर करण्यास मनाई आहे. त्यामुळे यंदा या घाटांवर बॅरिकेडींग केली जाणार आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. 


महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाकडे प्रशासनातील काही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. घाटांवर गणेश मूर्ती विसर्जनास मनाई असल्याची सूचना आयुक्त हर्डीकर यांनी केली. तरी देखील आरोग्य विभागाकडून घाटांवर सज्जता करण्यात येत आहे. 
 

घाटांवर मूर्ती विसर्जनास शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे घाटावर मूर्ती विसर्जनासाठी येणाºया नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशा पद्धतीने पावित्र्य राखून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. 
- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड


गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी घाटांवर कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी घाटांवर येऊ नये. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही बंधने गणेशोत्सवात पाळायची आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड  


सार्वजनिक मंडळे, हौसिंग सोसायटी, घरगुती तसेच इतर सर्वप्रकारच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास घाटांवर मनाई आहे. मात्र असे असले तरी घाटांची साफसफाई करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने घाटांवर कामकाज केले जात आहे. 
- डॉ. अनिल रॉय, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title: 'Disruption' of coordination regarding immersion in Municipal Corporation, Police system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.