जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा चिंचवड येथे सुरू; नितीन काळजे यांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:11 PM2018-02-01T13:11:22+5:302018-02-01T13:14:19+5:30
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित ‘महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे’ उद्घाटन नितीन काळजे यांच्या हस्ते चिंचवडगाव येथे झाले.
पिंपरी : जागतिक पातळीवर महापालिका हद्दीतील खेळाडू तयार झाले पाहिजेत. यासाठी महापालिका विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धा भरवत असते. तसेच महानगरपालिका विकासाबरोबरच खेळाला नेहमी प्राधान्य देत असते, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित ‘महापौर चषक जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे’ उद्घाटन नितीन काळजे यांच्या हस्ते चिंचवडगाव येथे झाले. मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास नगरसदस्या अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसदस्य सुरेश भोईर, मोरेश्वर शेंडगे, सहायक आयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, अशोक पटेकर, जयश्री भोज, अनिता पालवे, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटना सचिव प्रमोद चोळकर, पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव सुधीर माळसकर, वेटलिफ्टिंगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे, सजना पांडे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, विजय पाटील, अश्विनी पाटील, तुकाराम गायकवाड, श्री पाटोळे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी आदी उपस्थित होते.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच जागतिक पातळीचे खेळाडू तयार होण्यासाठी महापालिका सातत्याने असे उपक्रम राबवित असते. खेळाडूंनी मोठ्या संख्येने अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन महापालिकेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन नितीन काळजे यांनी केले. माजी महापौर विलास विठोबा लांडे आयोजित या स्पर्धेत सुमारे १७० खेळाडू सहभागी होणार असून, स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिसे व ट्रॉफी, मेडल्स प्रदान करण्यात येणार आहेत.
या वेळी वेटलिफ्टिंगचे ज्येष्ठ मार्गदर्शक बिहारीलाल दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांनी आभार मानले.