डीजे अन् गुलालविरहित मिरवणुका, पिंपरीत १२ अन् चिंचवडला ११ तास सोहळा; पारंपरिक वाद्यांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:41 PM2017-09-06T23:41:05+5:302017-09-06T23:41:59+5:30
ढोल, ताशा, झांज अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, मोहक फुलांची उधळण आणि रंगलेल्या
पिंपरी : ढोल, ताशा, झांज अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, मोहक फुलांची उधळण आणि रंगलेल्या फुगड्या, चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा मंगलमय वातावरणात पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने गणरायाला निरोप दिला. पिंपरीतील आनंदसोहळ्यात ८८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आणि चिंचवड परिसरात ५६ गणेश मंडळांचा समावेश होता. पिंपरीत १२ तास, तर चिंचवडला ११ तासांची मिरवणूक होती. शिस्तबद्ध आणि पारंपरिक वाद्याचा वापर आणि डीजे व गुलालविरहित मिरवणूक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
औद्योगिकनगरीचा नूर गेले बारा दिवस काही औरच होता. अवघी उद्योगनगरी गणेशमय झाली होती. शेवटच्या दिवशी सर्वांत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गणेश विसर्जन मिरवणूक चिंचवड आणि पिंपरी परिसरातून निघत असते. शेवटच्या दिवशी सकाळपासूनच घरगुती गणरायाचे विसर्जन करण्याची लगबग दिसून येत होती. शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांच्या सुमारे २६ विसर्जन घाटांवर विसर्जनाची तयारी झाली होती. चिंचवडमधील पवना नदीघाटावर सकाळी सातपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते; तर पिंपरीतील झुलेलाल नदीघाटावरही गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी दिसून येत होती. पावसाची उघडीप मिळाल्याने सकाळच्या टप्प्यात भक्तांनी घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. उन्हाची तीव्रता असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहात तसूभरही कमतरता जाणवत नव्हती.
पिंपरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात दुपारी एकला झाली, तर चिंचवड येथील आनंदसोहळ्याची सुरुवात दुपारी अडीचला झाली. पिंपरीगावातून साई चौकमार्गे शगुन चौकातही मंडळे येत होती, तर चिंचवड परिसरातील मिरवणूक चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, काळेवाडीमार्गे चापेकर चौकात येऊन जकातनाका रस्त्याने थेरगाव येथील पवना घाटावर जात होती.
महापालिकेकडून स्वागत
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शगुन चौक आणि चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारला होता. महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे यांनी स्वागत केले.
मूर्र्तिदान मोहिमेला प्रतिसाद
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनेही दोन्ही ठिकाणी स्वागत कक्ष उभारला होता. विसर्जन मार्गावर बॅरिकेड्स लावले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्हीची सोहळ्यावर नजर होती. प्राधिकरण नागरिक कृती समिती, पोलीस मित्र आदी सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली. संस्कार प्रतिष्ठानाने मूर्ती दान स्वीकारण्याची मोहीम राबविली.
गुलालाऐवजी फुले
यंदा मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर अधिक प्रमाणात दिसून आला़ त्याचबरोबर मोहक फुलांचे रथ लक्ष वेधून घेत होते. तसेच महिला मुली व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. रोषणाई केलेले रथही लक्ष वेधून घेत होते. मावळ व मुळशीतील ढोल ताशा पथकांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच वारकरी पथकेही सहभागी झाली होती.