न्यायालयीन साक्ष टाळू नको भावा; खावी लागेल पोलीस कोठडीची हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:49 PM2022-11-16T15:49:50+5:302022-11-16T15:52:19+5:30
न्यायालयीन साक्ष टाळून वाॅरंटला हलक्यात घेणाऱ्यांना बसणार दणका
- नारायण बडगुजर
पिंपरी : अनेकांकडून न्यायालयीन साक्ष टाळली जाते. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून कायदेशीर कार्यवाही करून अटक वाॅरंट जारी केले जातात. या वाॅरंटची अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडपोलिसांनी सहा महिन्यांत ४३० जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे न्यायालयीन साक्ष टाळून वाॅरंटला हलक्यात घेणाऱ्यांना आता महागात पडणार आहे.
विविध गुन्हे तसेच खटल्यांमध्ये आरोपी, साक्षीदार तसेच तपास अधिकारी यांची न्यायालयीन साक्ष होते. मात्र, त्यासाठी काही जण न्यायालयात हजर होत नाहीत. परिणामी संबंधित प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज प्रलंबित राहून ‘तारीख पे तारीख’ सुरू होते. न्यायालयाकडून समन्स बजावले जातात. त्यानंतरही न्यायालयीन साक्ष टाळल्यास जामीनपात्र वाॅरंट बजावला जातो. त्यानंतरही संबंधित व्यक्ती न्यायालयात हजर न राहिल्यास अटक वाॅरंट जारी केला जातो.
पोलीस करतात बजावणी
वाॅरंट जारी करण्यात आलेली व्यक्ती राहत असलेल्या भागातील, तालुक्यातील किंवा शहरातील संबंधित पोलीस ठाण्याकडून वाॅरंटची बजावणी केली जाते. जामीनपात्र वाॅरंट असल्यास न्यायालयाने दिलेल्या तारखेला संबंधित व्यक्तीने न्यायालयात हजर राहणे आवश्यक असते. मात्र, संबंधित व्यक्ती हजर न झाल्यास अटक वाॅरंट जारी होते. त्यानंतर पोलिसांकडून संबंधिताला अटक करून न्यायालयात हजर केले जाते.
पोलिसांसह साक्षीदारांनाही दणका
तपास अधिकारी असलेले पोलीस तसेच साक्षीदार देखील न्यायालयीन साक्ष देण्यासाठी हजर राहू शकले नाही तर त्यांच्या नावे न्यायालयाकडून जामीनपात्र वाॅरंट त्यानंतर अटक वाॅरंट काढण्यात येते. त्यामुळे संबंधित पोलीस आणि साक्षीदार यांनाही न्यायालयाची ‘तारीख’ टाळणे महागात पडू शकते.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून धडाका
विविध न्यायालयांनी जारी केलेले अटक वाॅरंटची बजावणी करण्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भर दिला आहे. मे ते ऑक्टोबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे २७१० अटक वाॅरंट प्राप्त झाले. यातील आरोपींना अटक करण्याचा धडाका पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे अशा ‘वाॅरंट’ला हलक्यात घेणाऱ्यांची तंतरली आहे.
परराज्यात हजर केले जाते
शहरात वास्तव्यास असलेल्या काही आरोपींच्या नावे परराज्यातील न्यायालयाकडून अटक वाॅरंट संबंधित पोलीस ठाण्यांकडे प्राप्त होतात. त्यानुसार संबंधित आरोपीला अटक होते. स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनुसार, परराज्यातील न्यायालयात संबधित आरोपीला हजर केले जाते. परजिल्ह्यातील न्यायालयाकडील वाॅरंट असल्यास संबंधित आरोपीला स्थानिक पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात.
नॉन बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार संबंधित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले जात आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. गुन्ह्याच्या स्वरुपानुसार संबंधित आरोपींना तत्काळ अटकदेखील करण्यात येत आहे.
- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड