POP च्या गणेश मूर्ती तयार करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 10:28 AM2023-07-10T10:28:11+5:302023-07-10T10:28:39+5:30

पिंपरी महापालिका परिसरातील मूर्तिकारांना तसेच कारखान्यांना केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्याची सूचना

Do not create Ganesha idols of POP otherwise legal action Notice of Pimpri Municipal Commissioner | POP च्या गणेश मूर्ती तयार करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांची सूचना

POP च्या गणेश मूर्ती तयार करू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई; पिंपरी महापालिका आयुक्तांची सूचना

googlenewsNext

पिंपरी : प्लॅस्टिकबंदीनंतर आता पीओपीच्या मूर्तींना पिंपरी चिंचवड शहरात बंदी घातली आहे. यंदाच्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करू नयेत, आणि वापरूनही नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच यंदा पर्यावरणपूरकगणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सन २०२१ पासून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक मूर्ती व पूजा साहित्याचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दि. १२ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी घातली आहे. तसेच, महापालिका कार्यक्षेत्रामध्ये मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना पीओपीपासून मूर्ती बनवू नये, असे आवाहन केले आहे. महापालिका परिसरातील मूर्तिकारांना तसेच कारखान्यांना केवळ पर्यावरणपूरक मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्याची सूचना केली आहे.

करा नैसर्गिक रंगाचा वापर

महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याबाबत आदेश पारित केले आहेत. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मातीच्या मूर्तींची निर्मिती करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मूर्तिकार, विक्रेत्यांना नोंदणी आवश्यक

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मूर्ती बनविणे अथवा विक्री करण्यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांना मनपा कार्यक्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला परवानगी देण्यात येणार नाही. विनापरवाना अनधिकृतपणे मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपाच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मूर्ती तयार करणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांनी याबाबतची परवानगी घेण्याकरिता मनपाच्या उद्योगधंदा व परवाना विभागाकडे संपर्क साधावा. परवानगीची एक प्रत पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीच्या दुकान अथवा स्टॉलच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे.

''शहरातील नागरिकांनी केवळ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीचे पूजा साहित्य वापरून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारखे उत्सव साजरे करावेत. - शेखर सिंह, आयुक्त'' 

Web Title: Do not create Ganesha idols of POP otherwise legal action Notice of Pimpri Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.