चार महिन्यांपासून टाकवेत नाही घंटागाडी
By Admin | Published: October 6, 2016 03:05 AM2016-10-06T03:05:50+5:302016-10-06T03:05:50+5:30
येथे गेल्या चार महिन्यांपासून घंटागाडी बंद असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. टाकवे बुद्रुक ही आंदर मावळाची प्रमुख बाजारपेठ असून, चार महिन्यांपासून घंटागाडी फिरकत नसल्याने
टाकवे बुद्रुक : येथे गेल्या चार महिन्यांपासून घंटागाडी बंद असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. टाकवे बुद्रुक ही आंदर मावळाची प्रमुख बाजारपेठ असून, चार महिन्यांपासून घंटागाडी फिरकत नसल्याने दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, मटन-चिकण विक्रेते आदी टाकवे-फळणे या रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत.
गावातील घरांमधील कचरा रस्त्यावर, गल्लीबोळात साचलेला पाहायला मिळत आहे. सध्या रिमझीम पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी असलेल्या ढिगातील कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. येथील ग्रुप ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानाला खो घातला असल्याची टीका होत आहे.
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूल, दवाखाना व परिसरात ओद्योगिक वसाहत आहे. मोठा आठवडे बाजारही भरतो. त्यामुळे येथे आंदर मावळातील नागरिकाची वर्दळ असते. मात्र, बाजारपेठेत घंटागाडी येत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत.
सध्या ग्रुप ग्रामपंचायतकडे आमदार फंड आणि खासदार फंडातून घेतलेल्या दोन घंटागाडी आणि १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून घेतलेला ट्रॅक्टर आहे. कचरा व्यवस्थापनासाठी तीन वाहने असूनही ग्रामपंचायत उदासीन का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामपंचायतने स्वच्छतेसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. लवकरात लवकर घंटागाडी चालू करावी, अशी मागणी बाजार समिती असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मोढवे, सोमनाथ असवले, विकास असवले, दत्ता गायकवाड, अजित असवले, उस्मान शेख, संदीप ओसवाल,
गणेश मोढवे आदींनी केली
आहे. (वार्ताहर)