डॉक्टर महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या ; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 07:20 PM2019-05-12T19:20:15+5:302019-05-12T19:21:56+5:30
सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली.
पिंपरी : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंबे सदन, उद्योगनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर विवाहितेचे नाव आहे. पती चेतन गोविंद चौधरी याच्यासह सासू रजनी चौधरी आणि सासरा गोविंद चौधरी यांच्याविरोधात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगिता आणि तिचा पती चेतन हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचा चिंचवड परिसरात दवाखाना आहे. योगिता आणि त्यांच्या सासरकडील मंडळींमध्ये विविध कारणांवरून वाद होत असे. शुक्रवारीदेखील त्यांच्यामध्ये वाद झाला. सासरकडील मंडळींनी योगिताच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामुळे पोलिसांनी योगिता यांना समज दिली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास योगिता घरी आल्या. त्यांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यामध्ये मिसळून प्यायले. काही वेळेनंतर सोसायटीजवळच्या किराणा दुकानात जाऊन बाटलीमध्ये रॉकेल आणले. मुंग्या मारण्याचे औषध प्यायल्याने योगिता यांना त्रास होवू लागला. यामुळे त्यांनी पतीला घरी बोलविले. रात्री साडेनऊ वाजता पती चेतन घरी आल्यावर त्याने योगिता यांना रागावून मारहाण केली. यामुळे संतापलेल्या योगिता यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर चेतनने त्यांच्या हातातील बाटली घेत उरलेले थोडे रॉकेल योगिता व स्वत:च्या अंगावर ओतून घेतले. रागाच्या भरात योगिता यांनी पतीच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेत योगिता १०० टक्के भाजल्या. उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, योगिता यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चेतनही २० टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. फौजदार एस. एस. झेंडे तपास करत आहेत.