पिंपरीत डॉक्टर कोव्हीड रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी घेतात एक लाख, त्यात बेडची रक्कम वेगळीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:33 PM2021-05-06T12:33:09+5:302021-05-06T12:38:34+5:30
पैसे उकळल्याप्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक
पिंपरी: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. सरकारी रुग्णालयात वेटिंग दाखवली जात आहे. बेड मिळ्वण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईक धावपळ करत असताना डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. पिंपरीत बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेतल्या प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी याप्रकरणी तीन डॉक्टरांना अटक केली असून, या तिघांना ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डॉ. जोत्स्ना नितीन दांडगे (वय ३२, रा. किवळे) दांडगे, असे अटक केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे आणि सचिन कसबे या तीन डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी डॉ. कसबे यांच्या रुग्णालयात पोलिसांना तीन लाख १० हजारांची रोकड मिळून आली.
डॉ. ज्योत्स्ना दांडगेचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे डॉ. ज्योत्स्नाला अटक करण्यात आली. डॉ. ज्योत्स्ना ही ऑटो क्लस्टर कोविड सेंटरमधील बेड उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेत होती. दोन रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले असून त्यासाठी डॉ. ज्योत्स्ना हिने १० हजार रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्या घरातून १० हजारांची रोकड जप्त केली. सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करत आहेत.