डॉक्टरला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा, कायदेशीर कारवाईनंतर पिंपरीतील डॉक्टरांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:14 AM2018-03-25T05:14:47+5:302018-03-25T05:14:47+5:30
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन केले.
पिंपरी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरला मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात डॉक्टरांनी आंदोलन केले. काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या डॉक्टरांची रुग्णालय व्यवस्थापनाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी आग्रही भूमिका डॉक्टरांनी घेतली. अखेर सायंकाळी पिंपरी पोलिसांनी डॉक्टरवर हल्ला करणाºयाविरोधात गुन्हा दाखल केला.
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात केतक अशोक गायकवाड (वय २६, रा. एचए वसाहत) या तरुणाला सोमवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाचा अचानक मृत्यू कसा झाला, याबाबत नातेवाइकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला. एका नातेवाइकाने चिडून डॉक्टरलाच मारहाण केली. जवळ पडलेल्या धारदार वस्तूने डॉक्टरवर हल्ला चढविला. त्यात डॉक्टर जखमी झाले. या घटनेमुळे रुग्णालयात काम करणारा डॉक्टर वर्ग संतप्त झाला. त्यांनी एकत्र येऊन शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे म्हणाले, ‘‘डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट कलम ४ नुसार डॉक्टरला मारहाण करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.’’
- डॉक्टरांवर हल्ला करणाºया आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार केला. दुपारपर्यंत डॉक्टरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र डॉक्टर संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला याबाबत सांगितले. शेवटी सायंकाळी या प्रकरणी डॉ. आदित्य पांडियाल यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.