निगडी येथे डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठरला तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:05 PM2019-05-06T13:05:07+5:302019-05-06T13:05:55+5:30
दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले होते.
पुणे : डॉक्टरांचा हलगर्जीपणा एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याची घटना निगडी प्राधिकरणातील स्टर्लिंग रुग्णालयात घडली. डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी घेण्यास नकार दिला.
धनश्री बाजीराव जाधव (वय २३, रा. नेरे, ता. मुळशी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद केली असून तरुणीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दातांची वाढ योग्य रीतीने न झाल्याने त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी धनश्रीला स्टर्लिंग रुग्णालयात २३ एप्रिलला दाखल केले. २४ एप्रिलला दुपारी बारा वाजता तिला शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया विभागात नेले. रात्री बारा वाजता तिला तेथून बाहेर आणले. त्या वेळी तिची प्रकृती गंभीर होती. तिला अतिदक्षता विभागात ठेवावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर धनश्री पुन्हा शुद्धीत आली नाही. शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे काका कैलास जाधव यांनी केला. लेखी तक्रार दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सध्या अपघाती मृत्यूची नोंद असून डॉक्टरांनी अहवाल दिल्यानंतर त्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिली.