भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 10:21 AM2023-09-01T10:21:29+5:302023-09-01T10:21:53+5:30

पिंपरीत उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण...

Does BJP have an option other than one person? : Question by Sushma Andhare | भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल

भाजपकडे एका व्यक्तीशिवाय पर्याय आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल

googlenewsNext

पिंपरी : भाजपविरोधात २८ पक्ष एकत्र आले आहेत. यातील सगळे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी टिकणार नाही, अशी टीका भाजप व त्यांनी नेमलेले कंत्राटदार करत आहेत. मात्र, इंडियाकडे एकसे बढकर एक पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. तेवढ्या ताकदीचे आणि शिकलेले ते आहेत. मात्र, गेली नऊ वर्षे झाली भाजपकडे पंतप्रधान म्हणून एकच व्यक्ती आहे. त्यांच्याकडे एकाशिवाय पर्याय आहे का, असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. पिंपरीमध्ये उद्धवश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अंधारे बोलत होत्या. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, सध्या संविधानिक चौकट उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ती वाचविण्याचे काम इंडिया करत आहे. दुरुस्त्या करण्याला विरोध नाही. पण जाणीवपूर्वक राजकारणात धर्म आणला जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची आज गरज आहे. शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका झाली. त्यात भाजपने सुपाऱ्या दिलेले राणे, राणा कंत्राटदार आघाडीवर आहेत. मी नीलेश अन् नितेश राणेबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात संस्कार नावाच्या व्हिटॅमिन्सची कमतरता आहे. राणांना उद्धव ठाकरेंचा दम पाहायची इच्छा झाली. सगळी भाजपातील नेतेमंडळी इंडियातील २८ पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरेंमध्ये किती दम आहे, हे सिद्ध झाले आहे.

त्यांच्या कपटी राजकारणाला ‘शाह’ यांचा शह

अंधारे म्हणाला, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कपटी राजकारण केले. त्यामुळे त्यांचा कार्यकाल हा कपटी मुख्यमंत्री म्हणूनच ओळखला जाईल. अमित शहा यांनी अजित पवारांना सोबत घेत फडणवीस यांच्या कपटी राजकारणाला शह दिला आहे. त्यामुळे फडणवीस यांचे राजकारण संपुष्टात आले असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

त्यांचे तीर्थ पिऊन पवित्र झालात..

महाराष्ट्रात भाजपने अजित पवारांच्या धरण वाक्यावर रान उठवले होते. शेवटी भाजपने पवारांना सत्तेत घेतले. त्यांनी धरणात जे केले त्यांचे तीर्थ घेऊन पवित्र झाले का, असा सवालही अंधारे यांनी भाजपला केला. इंडियाची बैठक मुंबईत होणार आहे. त्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत कमी केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हिताची व्याख्या ही अदानीशी आहे. त्यांना सामान्यांचं पडलेलं नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

शिल्लक सेनेतील लेकरे मांडीवर का घेता...

भाजपचे नेते अन् सोशल मीडिया ट्रोल्स म्हणतात, आता शिवसेना राहिली नसून ती शिल्लक सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जर शिल्लक कोणी नाही राहिले तर शिल्लक सेनेतील लेकरे मांडीवर का घेता अन् स्वत:चे उपाशी ठेवता, असे म्हणत अंधारे यांनी भाजपला टोला लगावला.

ऊठ दुपारी अन् घे सुपारी

दुपारी उठणाऱ्या सुपारीबाजांना आता शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. मात्र, समृद्धी महामार्गावर २७ लोकांचे जीव गेले. त्यांच्यावर सामूहिक अंत्यविधी होत असताना भाजप एक पक्ष फोडून शपथविधी करत होता. तेव्हा नैतिकतेच्या, महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे बोलणारे सुपारीबाज कुठे होते, असा खरमरीत सवालही अंधारे यांनी केला.

Web Title: Does BJP have an option other than one person? : Question by Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.