दहशत माजवायला चौक काय त्यांच्या बापाचा आहे का? 'त्यांना' तिथेच ठोकले पाहिजे : कृष्ण प्रकाश संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:16 AM2020-10-21T00:16:44+5:302020-10-21T00:21:33+5:30
काही सराईत गुंडाचा तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केलेल्या व्हायरल फोटोमुळे पोलीस आयुक्त संतापले..
पिंपरी : काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चॅनेलवरच (वॉकी टॉकी) संबंधित पोलिसांची झाडाझडती घेतली. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे काही सराईत गुंडानी तलवारीने केक कापल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याची गंभीर दखल घेतली. तलवारीने केक कापताना त्यात सहभागी सर्वांवर कारवाई करा. त्यांनी परवानगी घेतली होती का, त्यांच्यावर जुजबी कलमा अंतर्गत कारवाई झाली. यापुढे अशी चूक होता कामा नये. अशा विकृतींना समाजात नाही गजाआड ठेवल पाहिजे.
अशा गुन्हेगारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवला पाहिजे. त्यांना वाटले पाहिजे आता आमचे काही खरे नाही. ज्या चौकात ते दहशत पसरवतात त्यांना तेथेच ठोकले पाहिजे. ते कसे काय गर्दी करून दहशत पसरवू शकतात. त्या चौकात त्यांचे राज्य आहे का, पण हे लक्षात ठेवा. चौक सर्वसामान्य नागरिकांचा आहे. कुणाच्या बापाचा नाही. काहीजण दुचाकीचा आवाज काढत फिरतात. फॅन्सी नंबरप्लेट लावून बेशिस्तपणे वाहन चालवितात. त्यांच्यावरही कारवाई करा. पुन्हा तक्रार आल्यास संबंधित वरिष्ठ निरीक्षकांना मेमो दिला जाईल. त्यानंतर मी काय कारवाई करता ते तुम्ही बघालच, अशी तंबी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.