पाठीमागून वार करू नका, जगताप कुटुंब एकच आहे- आमदार अश्विनी जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:59 AM2023-10-11T10:59:21+5:302023-10-11T11:00:59+5:30
भाजपाच्या वतीने मिशन ४५ च्या माध्यमातून मावळ लोकसभेचा दौरा करण्यात येणार आहे...
पिंपरी : प्रोटोकॉल पाळला जात नसल्याबाबत आमदार अश्विनी जगताप यांनी पक्षाच्या पत्रकार परिषदेतच नाराजी व्यक्त केली. ‘‘मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, पाठीमागून वार करू नका, जगताप कुटुंब एकच आहे’’, असा निर्वाणीचा सल्ला भर पत्रकार परिषदेत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी भाजपाच्या शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. पत्रकारासंमोरच घडलेल्या प्रकाराची चर्चा शहरात आहे.
भाजपाच्या वतीने मिशन ४५ च्या माध्यमातून मावळ लोकसभेचा दौरा करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ११ ऑक्टोबरला ‘घर चलो अभियाना’च्या निमित्ताने शहरात येणार आहेत. याबाबत शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी आमदार अश्विनी जगताप यांची खुर्ची एका बाजूला ठेवली होती. हा प्रकार हेतुपुरस्परपणे केला असल्याचे लक्षात आल्याने आमदार जगताप चिडल्या. त्यावेळी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, शहाराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे आदी उपस्थित होते. आमदार जगताप चिडल्याने उपस्थित सर्वचजण अवाक् झाले.
ही आहे पार्श्वभूमी
भाजपाच्या शहर पातळीवर बदल करण्यात आले आहेत. पक्ष संघटनेच्या उपक्रमांची माहिती आमदार अश्विनी जगताप यांना मिळत नाही, राज्य संघटनांकडून येणाऱ्या सूचनाविषयी अवगत केले जात नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याचे पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी प्रोटोकॉल पाळला जात नाही, अशी भावना माझी झाल्याने चिडचिड झाली होती. पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.
-अश्विनी जगताप, आमदार.
मी मागे बसलो होतो. त्यावेळी आमदार जगताप पुढे या म्हणाल्या. ज्येष्ठांनी मागे राहू नये, पुढे येऊन बसा एवढेच घडले. याशिवाय बाकी काही नाही.
- नामदेव ढाके, सरचिटणीस भाजपा.