घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:33 IST2025-01-29T15:32:51+5:302025-01-29T15:33:55+5:30

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील, त्याला योग्यरित्या प्राधान्य द्या

Don't be afraid, if you get proper treatment, you will get better! Appeal from a young man who overcame 'GBS' and recovered | घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक उपचारक्षम आजार आहे. तो झाला म्हणून घाबरून जाऊ नका, व्यवस्थित उपचार करून घ्या, बरे व्हाल असे आशादायी आवाहन या आजारातून २०१९ मध्येच उपचार घेऊन बरे झालेल्या नीलेश अभंग यांनी केले. अभंग हे तब्बल साडेचार महिने या आजारामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल होते.

‘लोकमत’ने अभंग यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे.

फिजिओथेरपी आवश्यक

हात, पाय किंवा दोन्ही पॅरालाइज झालेले रुग्ण वेळीच योग्य उपचार घेतल्यास लवकर बरे होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांनी फिजिओथेरपीला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फिजिओथेरपीसाठी नियमितपणा महत्त्वाचा

पॅरालाइज झालेले अवयव दुरुस्त करायचे असतील, तर फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे. फिजिओथेरपीच्या नियमित उपचारांमुळे शरीरातील अवयव पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी नियमितपणे चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली उपचार घ्यायला हवे. चालढकल किंवा आळस केल्यास शरीराचा तो भाग कडक होऊ शकतो, आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची

रुग्णांच्या नातेवाईकांनी या काळात त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्ण फिजिओथेरपीसाठी पूर्णपणे नातेवाईकांवर अवलंबून असतो. त्यांना फिजिओथेरपीच्या क्लिनिकमध्ये ने-आण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मात्र, हा वेळ आणि मेहनत वाया जाणार नाही, कारण सुरुवातीच्या काळात शरीर वेगाने प्रतिसाद देते.

डॉक्टरांच्या सल्ल्याला गांभीर्याने घ्या

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील. पण त्यांचे हे शब्द हलक्यात घेऊ नका. जर कायमचे अपंगत्व टाळायचे असेल, तर सुरुवातीच्या काळात फिजिओथेरपीला प्राधान्य द्या. वेळ न घालवता योग्य उपचार घ्या, अन्यथा उशीर झाल्यास त्याचा दिलासा मिळत नाही.

अपंगत्व टाळण्यासाठी तत्काळ पावले उचला

शरीर ताजेतवाने असताना, स्नायूंमध्ये ताकद असते, आणि लवकर सुधारणा होऊ शकते. पण वेळ गेल्यावर शरीर कठीण होऊ शकते आणि त्यावर उपचार निष्फळ ठरू शकतात. त्यामुळे अडचण निर्माण होण्याआधीच उपाय करा, असे सांगत अभंग यांनी जीबीएस रुग्णांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.

हातांना किंवा पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यास अडचण होणे ही काही लक्षणे दिसून येतात. पण योग्य उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. - डॉ. श्रद्धा मोरे, सहायक प्राध्यापक, केईएम रुग्णालय, मुंबई

 

Web Title: Don't be afraid, if you get proper treatment, you will get better! Appeal from a young man who overcame 'GBS' and recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.