गेलेल्यांची चिंता नको, ते संपतील; जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 2, 2023 09:15 PM2023-12-02T21:15:59+5:302023-12-02T21:16:41+5:30
पिंपरीत खा. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही महविकास आघाडी लोकांना पसंत आहे. मात्र शिवसेना फोडली. राष्ट्रवादी फोडली. ही बुद्धी, चातुर्य, कपटीपणा कोणाचा हे जनतेला माहिती आहे. सर्व जण गेलेल्यांची चिंता व्यक्त करत होते. मात्र सद्या जे कार्यकर्ते सोबत आहेत त्यांची चिंता करा. गेलेले येत नसतात. ते संपून जातात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतून गेलेल्या नेत्यांवर केली. मी भाषणात सांगत होतो. सर्व गेले तरी चालेल. मात्र आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राज्य अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष जावेद, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, निहाल पानसरे, विशाल जाधव, देवेंद्र तायडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी नवीन पदनियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील असा विश्वास निर्माण करू. कोणत्याही मार्गातून सत्ता मिळवली तर ती लोकांना पटत नसते. शेतकरी, सामान्य माणूस यांच्यासाठी खा. पवारांनी काम केले. जे साथ सोडून गेलेत त्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. नगरसेवकांची मुदत संपली. त्यामुळे ती संख्या मोजू नका. नवीन खेळ सुरू झाला आहे. विकासकामांचा लेखा जोखा मांडा. नवीन नेतृत्व उभे करा. विचारांशी बांधिलकी ठेऊन पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियुक्ती करूनही खा. पवार यांच्यासोबत राहिलेत. तसा कार्यकर्ता घडावा.
ज्येष्ठ नेते आझम पानसरे आज उपस्थित राहिल्याने शहरातील जनता कुठे झुकतील हे समजत असल्याचे पाटील म्हणाले. सुलक्षणा शीलवंत यांचे तिकीट आमदार जयदेव गायकवाड म्हणाले की, पक्ष फुटल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वच गेले. काहींना वाटले पक्ष संपला. मात्र हा पक्ष उभारणी घेईल हे नक्की. सद्या ८० टक्के लोक इथ दिसत आहेत. खा. शरद पवार यांच्या विचारांनी पक्ष चालला आहे. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांनी पक्ष चालू आहे. विकासाच्या नावाखाली गेलेले सर्वसामान्याच्या आयुष्यात बदल घडवू शकले नाहीत. सद्या विविध प्रश्न आहेत. ते सोडवू शकले नाहीत.
प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यात घर फोडण्याची कामे भाजपा सरकार करत आहे. पिंपरी चिंचवड शहरात टाटा, बजाज आणि एचए कंपनी वाचविण्याचे काम खा. शरद पवार यांनी केले. गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. गॅसचे दर वाढवून लूट करण्याचे काम भाजपा सरकारने केले. त्यांना आगामी काळात त्यांची लायकी दाखवू.
शहराध्यक्ष कामठे म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून राजकीय कामात झोकून दिले आहे. सामाजिक काम करताना निवडणुकीच्या दरम्यान अनेकांनी डावलले. मात्र मी स्वतःला सिद्ध केले. भाजपामधून निवडून आलो. मात्र विचारधारा पटली नाही. त्यामुळे बाहेर पडायचा निर्णय घेतला. सत्तेसाठी राजकीय निर्णय घेत नाही. पिंपरी चिंचवड शहराच विकास खा. शरद पवार यांनी केला. त्यांची विचारधारा स्वीकारून कामाला सुरुवात. नवीन लोक उमेदीचे असतात. मात्र यांना घेऊनच पक्ष वाढवला जाईल. येणाऱ्या काळात ३० नगरसेवक सद्या निवडून येतील असे आपल्या पक्षात आले आहेत. पक्षाचा झेंडा महापालिकेवर झेंडा फडकवला जाईल. पदाला साजेसे काम करू.
सुलक्षणा धर म्हणाल्या की, शहराच्या विकासात खा. शरद पवारांचा मोठा वाटा आहे. पक्ष फुटल्यानंतर सर्वच पक्ष सोडून पलीकडे गेले. मात्र आम्ही साहेबांची साथ सोडली नाही. २०१९ मध्ये मला उमेदवारी दिली. मात्र राजकारण झाले आणि मला उमेदवारी मागे घ्यावी लागली. पक्षाने विश्वास ठेवला. पुढेही पक्षाला योग्य काम करू. लोकसभेला प्रामाणिक काम करू. तिकडे गेलेली लोक आम्हाला चिडवत आहेत. मात्र आम्ही आमच्याकडे सत्ता नसली तरी साहेब आमच्याकडे आहेत असे शिलवंत म्हणाल्या.
आम्हाला अजित पवारांनी दम दिला...
युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले की, खा. पवारांनी राजीनामा दिला तेव्हा आनंद परांजपे कुठेच न्हवते. आंदोलन करायला लावले नाही. आम्ही स्वतः केले. त्यावेळी काहींनी मला ३ मे रोजी फोन करून आंदोलन करायचं नाही असा दम दिल्याचे शेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता म्हणाले. आमचा घरगुती प्रश्न आहे. तू लक्ष घालू नको,असेही शेख म्हणाले.