संतापजनक! तिकोणा गडावरील दरवाजा पर्यटकांनी तोडला ; दुर्गप्रेमींकडून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:42 PM2020-10-06T15:42:04+5:302020-10-06T15:50:15+5:30
पवन मावळातील तिकोणा गडावरील दरवाजा तोडून पर्यटक गडावर गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पवनानगर : पर्यटन बंदीचा आदेश झुगारून रविवारी (दि. ४) पहाटे पवन मावळातील तिकोणा गडावरील दरवाजा तोडून पर्यटक गडावर गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी आणि दुर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पवनमावळसह मावळ तालुक्यात पुणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन बंदीचा आदेश लागू केला आहे. तरी या आदेशाला रविवारी पर्यटकांनी केराची टोपली दाखविली. कोरोनामुळे किल्ले तिकोणा गडावरील दरवाज्या बंद करण्यात आला होता. तरीही काही पर्यटकांनी रविवारी पहाटेच्या सुमारास तिकोणा गडावरील बाल किल्ल्याच्या दरवाज्याची मोडतोड करुन गडावर गेले. दोन वर्षांपूर्वी श्रमदानातून गडावर दरवाजा बसविण्यात आला होता. गडावरील दरवाज्या तोडण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये संतापची लाट उसळली आहे.
शिवप्रेमींनी लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बजंरग दल व सह्याद्री प्रतिष्ठाणच्यावतीने लोणावळा ग्रामीणचे उपनिरिक्षक निरंजन रनवरे यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी इतिहास संशोधक प्रमोद बोºहाडे, बजरंग दलाचे जिल्हामंत्री अमित भेगडे, गोपीचंद कचरे, संदेश भेगडे, सदानंद पिलाने, सचिन शेडगे, विशाल सुरत्वाला, गणेश निसळ, पोलीस पाटील अनंता खापरे, बाळा फाकटकर, मारुती देवकर, अक्षय पिंगळे, संकेत जगताप आदी उपस्थित होते